महेश सरलष्कर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असले तरी, अत्यंत महत्त्वाची राजकीय भेट मात्र शुक्रवारी रात्री उशिरा झाली! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘’६-अ’’ कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी शिंदे आणि फडणवीस यांनी सुमारे सहा तास चर्चा केली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्रीनंतर अडीच वाजता संपली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणाऱ्या सुनावणीसंदर्भातील कायदेशीर गुंतागुंत या दोन मुद्द्यांवर प्रामुख्याने खलबते झाल्याचे समजते. त्यामुळे खातेवाटप कधी हाच प्रश्न विचारला जात असून मोदींच्या भेटीआधी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

“…तेव्हा शिंदे गट काय करणार?” शिवसेनेचा बंडखोर आमदारांना सवाल, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरूनही टीका!

शिंदे आणि फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सोमवारी (११ जुलै) सुनावणी होणार असून त्यानंतरच मंत्रिमंडळाची विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील ११ तर भाजपच्या २८ आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते, यावर प्राथमिक सहमती झाली असली तरी, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अंतिम निर्णय घेतलेला नव्हता. शहा यांच्याशी शुक्रवारी झालेल्या बैठकीमधून मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.

गडकरी – फडणवीस समर्थकांमध्ये समन्वय की एका गटाला झुकते माप?

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दिल्लीत येऊन दाखल झाले. हे दोघेही थेट अमित शहांच्या भेटीला न जाता नवीन महाराष्ट्र सदनात आले. दोघाही नेत्यांभोवती पत्रकारांचा गराडा पडला पण, यावेळी फडणवीस स्वतःहून मागे राहिले. महाराष्ट्र सदनात तसेच, विमानतळावरही शिंदे यांनीच प्रसारमाध्यमांना त्रोटक बाइट दिला! महाराष्ट्र सदनात आल्यानंतर दहा-पंधरा मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीस एकटेच सदनातून बाहेर पडले. फडणवीस आधी शहांकडे पोहोचले होते. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता शिंदे हे शहांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या भेटीदरम्यान, ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे व फडणवीस दोघेही जनतेची निष्ठापूर्वक सेवा करतील व महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील’, असे ट्वीटही शहांनी केले.

पाहा व्हिडीओ –

भाजपचे वर्चस्व सिद्ध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे-फडणवीस यांच्या दिल्लीदौऱ्यातील दुसरा दिवस, शनिवारीही भेटीगाठींचा असेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर शिंदे व फडणवीस भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशीही चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाल्यानंतर शिंदे यांनी दुसऱ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाची राजकीय चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ निश्चित केली आहे. शहा आणि नड्डा यांच्या भेटींमुळे राज्यातील शिंदेंच्या सरकारवर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे! शिंदे यांनी अमित शहा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाची चर्चा केली असल्याने नड्डा यांच्याशी शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युती मजबूत करणे व शिवसेनेला अधिकाधिक खिंडार पाडण्यासाठी आगामी काळात कोणती पावले उचलावी लागतील यावर प्रामुख्याने चर्चा केली जाणार असल्याचे समजते. नड्डा यांच्या व्यतिरिक्त शिंदे व फडणवीस केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेणार असून त्यानंतर दिल्ली दौऱ्यातील शेवटची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असेल. या राजकीय भेटींनंतर शिंदे-फडणवीस द्वयी दिल्लीहून पुण्याला रवाना होतील.