हर्षद कशाळकर
अलिबाग- शिववसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येत्या गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जनसंवाद दौऱ्या दरम्यान ते जिल्ह्यात सहा ठिकाणी सभा घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेला उभारी देण्याचा प्रय़त्न यामाध्यमातून केला जाणार आहे. यात पक्षप्रमुख कितपत यशस्वी ठरतील हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. येत्या महिन्याभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते तयारीला लागले आहेत. तालुका वार कार्यकर्ता मेळावे घेऊन त्यांनी संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. आता पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेही दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यावर येत आहे.
उद्या सकाळपासून या दौऱ्याची सुरवात होणार असून सकाळी ११ वाजता पेण येथे दुपारी ३ वाजता चौल अलिबाग येथे तर संध्याकाळी ६ वाजता रोह्यात त्यांची जनसंवाद सभा होणार आहे. २ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पोलादपूर येथे, ३ वाजता म्हसळा येथे तर ६ वाजता माणगाव येथे त्यांची जनसंवाद सभा होणार आहे.
हेही वाचा >>>‘पाणीदार आमदार’ काळाच्या पडद्याआड….
हेही वाचा >>>राज्यातील भाजपच्या मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी?
भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या तिन्ही शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर रायगड जिल्ह्यात पक्षसंघटनेला मोठे खिंडार पडले होते. पक्षाचे अनेक कार्यकर्तेही आमदारांसोबत शिंदे गटात सामील झाले. यामुळे जिल्ह्यात पक्षसंघटनेची मोठी हानी झाली होती. पडत्या काळात पक्षनिष्ठ राहीलेल्या जुन्या सहकाऱ्यांनी पक्ष संघटनेचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. महाड मध्ये काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांना पक्षात घेऊन ठाकरे यांनी पक्षाची वाताहत भरून काढली. शेकाप आणि काँग्रेसशी जुळवून घेत इंडीया आघाडीचा पर्यात रायगडकरांसमोर उभा केला. आता या सर्व बदललेल्या राजकीय समिकरणांसह रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. अनंत गीते यांना उमेदवार म्हणून पाठींबा देण्याची घोषणा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी यापुर्वीच केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा दौऱा संघटनेसाठी महत्वाचा ठरणार आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यात ठाकरे यशस्वी ठरणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होऊ शकेल. भाजप, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा महायुतीच्या पक्षांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. अशावेळी मतदारांना पुन्हा एकदा भावनिक साद घालून आपल्याकडे वळवण्यात ठाकरे यशस्वी होणार का हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
पक्षप्रमुखांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असून, गाव निहाय बैठका घेऊन या दौऱ्याचे नियोजन केले आहे. या दौऱ्यामुळे संघटनेला नवचेतना मिळेल असा विश्वास जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला.