Latest News on Maharashtra Politics Today : आज दिवसभरात मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना तातडीने अटक करण्याची मागणी काँग्रेसने केली, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल ५० वेळा पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याचे सांगत राहुल गांधी यांनी भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला… आणि काँग्रेसच्या बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत गायल्यामुळे मोठा राजकीय वादंग निर्माण झाला. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
रणजितसिंह निंबाळकरांच्या अटकेची मागणी
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला कोंडीत पकडलं आहे. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे जाऊन मृत संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, ‘संपदा मुंडे यांनी जीवन संपवले नसून त्यांची हत्या झाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही’ असे विधान सपकाळ यांनी केले. “डॉक्टर संपदा यांनी दबाव आणि छळाला कंटाळून आयुष्य संपवले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाने एसआयटीची स्थापना करावी. तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करण्यात यावी”, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का
आगामी काळात मुंबई महापालिकेसह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. काल परवाच सोलापूर येथील शिंदेसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता मोहोळ तालुक्यातील शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश शिरसागर भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील प्रदेश भाजपाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षातील काही नेते आणि पदाधिकारी भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याने खासदार नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : Ranjitsinh Naik Nimbalkar : महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून रणजितसिंह निंबाळकर का अडचणीत आले?
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर निंबाळकर यांनी अंधारे यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. ‘सुषमा अंधारे यांनी येत्या ४८ तासांमध्ये जाहीरपणे आपली माफी मागावी अशी नोटीसही त्यांनी पाठवली आहे. या संपूर्ण प्रकारानंतर अंधारे यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजपासह राज्य महिला आयोगावर टीका केली आहे. “राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगावर राजकीय हेतून प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागवायला हवं. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बदनामी केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सुनील तटकरे यांनी तातडीने राजीनामा घ्यावा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचा ५० वेळा अपमान केला- राहुल गांधी
बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राजदचे प्रमुख तेजस्वी यादव यांनी सध्या राज्यात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज दोन्ही नेत्यांनी मुजफ्फरपूरनंतर दरभंग्यात सभा घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करीत भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम केल्याचे सांगत मोदींचा ५० वेळा अपमान केला, पण पंतप्रधानांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. असा नेता देशाचा कसा सन्मान राखणार? आणि बिहारचा विकास काय करणार? अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये दाखवलेल्या धाडसाचाही दाखला दिला.
काँग्रेसच्या बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत?
आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. २७ ऑक्टोबर रोजी आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात सेवा दलाची बैठक पार पडली होती. या बैठकीत काँग्रेस नेते विधू भूषण दास यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत गायल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. भाजपाने हाच धागा पकडत विरोधकांना लक्ष्य केले. आसामचा श्रीभूमी शहर हे बांगलादेशच्या सीमेला लागून वसलेले आहे. या जिल्ह्यात बंगाली भाषिकाची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसने आपल्या कृतीच्या माध्यमातून मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे भाजपाने म्हटले आहे. “श्रीभूमी येथील काँग्रेसच्या बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत बांगलादेशचे राष्ट्रगीत गायले गेले. हे तेच लोक आहेत, जे ईशान्य भारताला मुख्य भारतापासून वेगळे करू इच्छित होते. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष आसाममधील अवैध घुसखोरांना का पाठिंबा देत होता, याचे कारण आता समोर आले आहे, अशी टीका भाजपाचे नेते अशोक सिंघल यांनी केली आहे.
