नागपूर: सलग चारवेळा विधानसभेची निवडणूक चढत्या मताधिक्याने जिंकणारे पूर्व नागपूरचे भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे हे केवळ त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी जनसंपर्क कार्यालय उघडल्याने अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी याबाबत थेट पोलिसांकडेच तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. यातून या दोन नेत्यांमधील अप्रत्यक्ष राजकीय संघर्ष तर दिसून येतोच त्याशिवाय मतदारसंघावरील वर्चस्व टिकवण्याची खोपडे यांची धडपडही प्रतिबिंबीत होते.
नागपूर शहर भाजपचा बालेकिल्ला आहे. विधानसभेच्या सहापैकी चार जागा भाजपकडे आहे. या चारपैकी पक्षची सर्वात मजबूत स्थिती ही पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात आहे. २००९ ते २०२४ अशा विधानसभेच्या चार निवडणुका खोपडे यांनी येथून चढत्या मताधिक्याने जिंकल्या. २०१४, २०१९ आणि २०२४ या लोकसभेच्या तीन निवडणुकीत नागपूरमध्ये भाजप नेते व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातूनच सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. यावरून या मतदारसंघावरील खोपडे यांची पकड किती मजबूत आहे, याची खात्री पटते, नगरसेवक ते आमदार असा प्रवास करणारे खोपडे सर्वसामान्यांना चोवीस तास उपलब्ध असतात, त्यामुळे लोकांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे.
पूर्व नागपूरमध्ये दुसरा मोठा पक्ष काँग्रेस आहे, पण संघटनात्मक पातळीवर आणि नेतृत्वाच्या अभावामुळे हा पक्ष सध्यातरी भाजपपुढे आव्हान उभा करू शकेल या स्थितीत नाही, असे असतानाही खोपडेंनी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयाला विरोध करणे अनाकलणीय आहे. या माध्यमातून काँग्रेसकडून नेतृत्व पुढे येत असल्याची शक्यता आहे, असे खोपडे यांना वाटते का? वंजारी यांचे कार्यालय काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न असू शकेल का ? ते खोपडे यांच्या “बालेकिल्ल्याला” आव्हान देणारे ठरणार का ? असे एक नव्हे तर अनेक प्रश्न यानिमित्ताने राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.
काय घडले नेमके ?
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांचे कार्यक्षेत्र नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांचे असले तरी त्यांचे निवासस्थान पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या फलकावर ‘पूर्व नागपूर मतदारसंघ’ असा उल्लेख केला. मात्र फलकावरील आमदार पूर्व नागपूर, या उल्लेखाने खोपडे व त्यांचे समर्थक संतापले. वंजारी हे विधान परिषद सदस्य आहेत, ते पूर्व नागपूरचे आमदार नाहीत, पण त्यांनी त्यांच्या फलकावर त्यांच्या नावापुढे पूर्व नागपूर मतदारसंघ असा उल्लेख का केला? असा सवाल भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केला असून याबाबत लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
खोपडेंच्या ‘अस्वस्थतेचे’ कारण
अभिजित वंजारी हे नागपूरचेच काँग्रेस नेते असून त्यांचे कार्यक्षेत्रही पूर्व नागपूरच आहे. यापूर्वी ते या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढले आहेत. त्यात त्यांचा परभाव झाला होता. त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार होते. पूर्व नागपूर हा मतदारसंघ २००९ पूर्वी काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. या पक्षाचे नेते सतीश चतुर्वेदी येथून पाच वेळा निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसची मुळे या मतदारसंघात खोलवर रुजली आहेत. विधान परिषदेचे का असेना पण वंजारी हे विद्यमान आमदार असल्याने त्यांना त्यांचे जनसंपर्क कार्यालय येथे सुरू करण्याचा अधिकार आहे, या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न वंजारीचा असू शकतो. हीच भीती खोपडेंना वाटते. हा वाद राजकीय सामर्थ्यसंग्रामाचे लक्षण आहे. लोकशाहीत कोणत्याही पक्षाला स्थायिक वर्चस्व मिळत नाही — जनतेचा कल बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष आणि नेता दुसऱ्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवतो.या प्रकारामुळे काँग्रेसला थोडीशी प्रसिद्धी आणि जोश मिळू शकतो, तर भाजपसाठी ही एक प्रकारे “सावध” राहण्याची घंटा ठरू शकते.