नवी मुंबई : सांगली, सातारा, कोल्हापूर यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील मुळ रहिवाशी असलेला आणि मराठा बहुल राजकारणाचे नवी मुंबईतील केंद्र मानला जाणाऱ्या माथाडी कामगारांच्या सलग दुसऱ्या मेळाव्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्याने आगामी निवडणुकांमध्ये माथाडी बहुल वस्त्यांमधून वर्चस्वाच्या आशेवर असलेल्या शिंदे यांच्या शहरातील शिलेदारांना सध्या चिंतातूर दिसू लागले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना या मेळाव्याच्या आयोजनासाठी स्वत: शिंदे यांनीच गळ घातली होती. आधी बुधवार, मग गुरुवार सकाळी आणि शेवटी त्याच दिवशी सायंकाळी अशा वेळ, तारखा बदलांचे घोळ घालत शिंदे यांनी पाटील यांच्या कार्यक्रमापुर्वीच नाकीनऊ आणले होते. अखेर ठरवून दिलेल्या वेळेतही शिंदे बच्चू कडु यांच्या मोर्च्याचे कारण देऊन फिरकले नाहीत. त्यामुळे नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी आलेल्या माथाडी कामगारांचा मोठा हिरमोड झाला असून भाषणा दरम्यान नरेंद्र पाटील यांना फुटलेल्या हुंदक्यांमुळे शिंदेच्या नवी मुंबईतील समर्थकांना आता घाम फुटू लागला आहे.

आगरी, कोळी समाजाचा भरणा असलेल्या नवी मुंबईचा सामाजिक चेहरा गेल्या काही वर्षांपासून पुर्णपणे बदलला आहे. वाशी येथील एपीएमसी बाजारपेठांमुळे या ठिकाणी जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव, राजगुरुनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर यासारख्या पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला मुळ व्यापारी, माथाडी, मापाडी, कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने स्थिरावला आहे. वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरुळ या उपनगरांमधील अनेक वस्त्यांमधील निर्णायक मतदार म्हणून या कुटुंबांकडे पाहीले जाते. राष्ट्रवादी काॅग्रेस आणि शरद पवार यांचा मोठा प्रभाव या वस्त्यांवर वर्षानुवर्षे दिसून आला. पवारांच्या माध्यमातून गणेश नाईक यांनीही स्वत:च्या समर्थकांची एक मोठी फळी या भागात तयार केली. पुढे राजकारणाने कुस बदलली आणि नाईकही भाजपवासी झाले. नाईक यांच्या पाठोपाठ माथाडी, व्यापारी वस्त्यांमधील समर्थकांनीही कमळ हाती घेतल्याचे पहायला मिळाले. आगामी महापालिका निवडणुकीत गणेश नाईक यांच्याशी संघर्ष करायचा असेल तर माथाडी, मापाडी आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील मुळ रहिवाशांमध्ये मांड जमवायला हवी याची पुरेपूर कल्पना एकनाथ शिंदे यांना आहे. त्यातूनच गुरुवारी वाशी येथील एपीएमसी बाजार आवारात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र वेळ, कार्यक्रम याचे गणित जुळविण्यात अपयशी ठरलेल्या शिंदे यांना या मेळाव्याकडे पाठ फिरवावी लागली. त्याचे राजकीय पडसाद आता शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे.

नरेंद्र पाटील यांच्यासाठी इतके आड..तिकडे विहीर

माथाडी कामगारांचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे कनिष्ठ पुत्र असलेले नरेंद्र पाटील यांना शरद पवार यांनी पहिल्यांदा विधान परिषदेवर पाठविले. आमदार झाल्याच्या आनंदात काही दिवस ते पवारांसोबत रमले देखील. मात्र थोरल्या पवारांचे प्रेम त्यांच्यापेक्षा साताऱ्याचे आमदार माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्यावर अधिक जाणवायचे. २०१४ मध्ये देशात आणि राज्यात भाजपचे अच्छे दिन सुरु होताच नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधली. त्यापुर्वी साताऱ्यातून ते उदयनराजे यांच्या विरोधात शिवसेनेच्या चिन्हावर लोकसभा लढले होते. मात्र शिवसेनेपेक्षा भाजपशी त्यांची जवळीक होती. फडणवीस यांनाही माथाडी राजकारणात नरेंद्र यांच्या रुपाने चेहरा मिळाला आणि त्यांची निवड अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर करण्यात आली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडले. अण्णासाहेब पाटील यांच्या जन्मदिवस आणि पुण्यतिथी अशा दोन तारखांना नवी मुंबईत माथाडी मेळावे होत असतात. या मेळाव्यांना मुख्यमंत्र्यांना प्रमुख पाहून म्हणून आमंत्रित करण्याचा प्रघात आहे. या मेळाव्यांना शिंदे नवी मुंबईत येत, तरीही नरेंद्र पाटील यांचा कल फडणवीस यांच्याकडेच दिसून आला. २५ सप्टेंबर रोजी नवी मुंबईत झालेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले गेले. त्यावेळेस एकनाथ शिंदे ओल्या दुष्काळाची पहाणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. फडणवीसांच्या उपस्थितीत हा संपूर्ण मेळावा भाजपमय झाल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर स्वत: एकनाथ शिंदे यांनीच नरेंद्र पाटील यांच्याकडे गुरुवारच्या मेळाव्यासाठी आग्रह धरल्याचे सुत्रांनी सांगितले. स्वत: आग्रह धरुनही आणि वेगवेगळ्या तारखांचा घोळ घालत शिंदे अखेरपर्यत या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. बच्चू कडू यांच्या आंदोलन आणि मुंबईतील बैठकीचे कारण यासाठी पुढे केले गेले. मात्र या मेळाव्याच्या आयोजनासाठी दिवसरात्र करणाऱ्या नरेंद्र पाटील यांचा झालेला हिरमोड कार्यक्रमस्थळी असलेल्यांना स्पष्टपणे जाणवला. सभेस्थानी भाषण करताना पाटील यांंचा कंठ दाटून आला आणि त्यांना रडू कोसळले. ‘साहेब येईपर्यत मी येथून हलणार नाही’ अशी घोषणाही त्यांनी करुन टाकली. अखेर मध्यरात्रीनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी नरेंद्र पाटील यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर बोलण करुन दिले. तेव्हाकुठे पाटील घरी परतले खरे मात्र यानिमित्ताने घडलेला सगळा प्रकार शिंदेंच्या नवी मुंबईतील शिलेदारांना धडकी भरवू लागला आहे.