प्रबोध देशपांडे

अकोला जिल्ह्यात शिंदे गटाकडून पाय रोवले जात आहेत. शिंदे गटात सहभागी झाल्यावर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी लगेच आपल्या समर्थकांची विविध पदांवर नियुक्ती करून संघटनात्मक कार्याला सुरुवात केली आहे. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी कार्यकर्त्यांची मात्र वानवा असल्याचे प्रामुख्याने दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यात तळागाळात संघटन बांधणीचे मोठे आव्हान शिंदे गटापुढे राहणार आहे. 

अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार नितीन देशमुख एकनाथ शिंदेंची साथ सोडून उद्धव ठाकरेंकडे परतल्यानंतर शिंदे गटाला जिल्ह्यात सक्षम समर्थकांची गरज होती. शिवसेनेत नाराज असलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांचा गट एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागला. गोपीकिशन बाजोरिया आपले पुत्र आमदार विप्लव बाजोरिया व निवडक समर्थकांसह मुंबई येथे जाहीररित्या शिंदे गटात सहभागी झाले. बाजोरिया यांनी समर्थन देताच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची मोठी जबाबदारी दिली. बाजोरिया अकोल्यात परतल्यावर त्यांनी संघटनात्मक आढावा घेऊन काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये त्यांच्यासोबत शिंदे गटात गेलेल्यांनाच पदे देण्यात आली. शिंदे गटाकडून दोन जिल्हा प्रमुख नेमण्यात आले आहेत. अकोला पश्चिम, मूर्तिजापूर व अकोट विधानसभा मतदारसंघ जिल्हा प्रमुख म्हणून अश्विन नवले, तर बाळापूर व अकोला पूर्व जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी विठ्ठल सरप यांच्यावर देण्यात आली आहे. अकोला महानगर प्रमुखपदी योगेश अग्रवाल, निवासी उपजिल्हा प्रमुख योगेश बुंदेले व उपजिल्हा प्रमुख म्हणून शशिकांत चोपडे यांची नियुक्ती करण्यत आली आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप-शिवसेना युतीमध्ये अकोला, वाशीम व बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून गोपीकिशन बाजोरिया सलग तीनवेळा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत मविआचे उमेदवार म्हणून बाजोरिया यांना भाजपचे उमेदवार नितीन खंडेलवाल यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप करण्यात आला. पक्षनेतृत्वाकडे त्यांच्या तक्रारी झाल्यावरही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बाजोरिया शिवसेनेत नाराज होते. आता त्यांनी शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. अकोला जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे, तर ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीचा पगडा आहे. मूळ शिवसेनेचे अगोदरही गटबाजीमुळे कुठेही फारसे वर्चस्व नव्हते. आता तर शिवसेना विभागली गेली आहे. या परिस्थितीत शिंदे गटाला शहरासह ग्रामीण भागात अस्तित्व निर्माण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.