छत्रपती संभाजीनगर: वायनाड लोकसभा सदस्य राहुल गांधी यांना अपात्र केल्यानंतर सत्ताविरोधी मानसिकता घडविण्याचा मोठा मुद्दा महाविकास आघाडीच्या हाती लागला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे २ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेतही केंद्र व राज्य सरकारच्या विरोधातील आवाज उंचावला जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील या सभेनंतर राजकीय पाठशिवणीचा भाग म्हणून शिवसेनेच्या वतीने धनुष्यबाण यात्रा काढण्यात येणार असून त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरपासून मुख्यमंत्री करतील. ७ किंवा ८ एप्रिल रेाजी ही यात्रा निघणार आहे.

महाविकास आघाडीच्या सभेस उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, कॉग्रेस अध्यक्ष नाना पटोले आदी नेते २ एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणाऱ्या सभेस हजेरी लावणार आहेत. ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शहरात येणार आहेत. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर ते काय आणि कसे बोलतात यावर मतांच्या ध्रुवीकरणाचे रंग बदलतील असा दावा केला जात आहे. या सभेच्या तयारीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्वतंत्र दौरे केले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही मराठवाड्याच्या दौरा करुन ‘शिवसैनिक’ आपल्याच बाजूने  आहे ना, याची खात्री करुन घेतली.

हेही वाचा >>> शेतकरी चळवळीतील दोन खंदे शिलेदार एकत्र येणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यकर्ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्याच बाजूचे असल्याचा दावा केला जात आहे. ज्या दिवशी महाविकास आघाडीच्या सभेच्या तयारीचा भाग म्हणून रविवारी मेळावा घेण्यात आला. त्याच दिवशी सत्ताधारी शिवसेनेकडूनही मेळावा घेण्यात आला. त्यालाही मोठी गर्दी जमविण्यात आली होती. दरम्यान ठाकरे गटाच्या सभेनंतर शिवसेनेकडून आखल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देताना पालकमंत्री तथा रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे म्हणाले, ‘८ किंवा ९ एप्रिल रोजी धनुष्यबाण मिरवणूक काढण्याचे आमचे नियोजन ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या  धनुष्यबाण मिरवणुकीस येणार असून त्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर शिवसैनिक ते चिन्ह मिरवणुकीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आणतील आणि तेथे मुख्यमंत्र्यांची सभा होईल.’ अधिवेशनानंतर परतलेल्या नेत्यांनी रविवारपासून पुन्हा कार्यकर्त्यांना जोडून घेण्याचे कार्यक्रम आखणीला सुरूवात केली आहे.