Election Commission on EVM Vote Counting : लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीतील पत्रकार परिषदेतून भाजपासह केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने बुधवारी आपल्या ईसीआयनेट पोर्टलमध्ये महत्त्वाचे बदल केले. या निर्णयाची संपूर्ण देशात चर्चा होत असताना गुरुवारी आयोगाने मतमोजणी प्रक्रियेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात अधिकृत परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या नवीन नियमांनुसार आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी टपाल मतपत्रिकेच्या मोजणीनंतरच केली जाणार आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एका पत्रकाद्वारे ही सूचना देण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यासाठी आणि टपाल मतांच्या मोजणीबाबत स्पष्टता ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. या बदलामुळे मतमोजणीला पारदर्शकता येईल आणि कोणतेही कथित गैरप्रकार घडणार नाहीत, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

मतांची मोजणी कशी केली जाते?
खरंतर निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पोस्टल बॅलेटची मतमोजणी ही सकाळी ८ वाजता सुरू होते; तर ईव्हीएम मतमोजणी सकाळी ८:३० वाजता सुरू केली जाते. आधी ईव्हीएमची मोजणी ही पोस्टल बॅलेटच्या मोजणीच्या कुठल्याही टप्प्यात सुरू राहत असे. तसेच ती आधी पूर्ण होण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नव्हती. मात्र, नियमांत बदल केल्यामुळे आता ईव्हीएम/व्हीहीपॅटच्या मोजणीचा दुसरा टप्पा हा पोस्टल बॅलेटमधील मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल, असे निवडणूक आयोगाने पत्रकात म्हटले.

इंडिया आघाडीने काय केली होती मागणी?
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील टपाल मतपत्रिकांची मोजणी ईव्हीएम मतमोजणीनंतर करण्यात आली होती. त्यामुळे निकालाचे चित्र पालटल्याचे पाहायला मिळाले होते. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातही टपाल मतपत्रिकांच्या मोजणीनंतरच निकाल फिरला होता. त्यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा फक्त ४८ मताधिक्याने पराभव झाला होता. या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी ईव्हीएम आणि टपाल मतपत्रिकेच्या मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाकडे काही मागण्या केल्या होत्या. इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही आयोगाला २०१९ चा आदेश मागे घेऊन टपाल मते पूर्ण मोजून झाल्यानंतरच ईव्हीएमच्या उपांत्य फेरीची मोजणी करावी, अशी विनंती केली होती. मात्र, तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही मागणी फेटाळली होती. निवडणूक प्रक्रियेच्या मध्यावर नियम बदलणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

२०१९ मध्ये बदललेला नियम आता पुन्हा लागू
तमिळनाडूतील द्रमुक पक्षाने १७ जुलै रोजी निवडणूक आयोगाच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला होता. २०१९ पूर्वी आयोगाकडून सर्व टपाल मते मोजून झाल्यानंतरच ईव्हीएम मतांची उपांत्य फेरी मोजण्याची प्रक्रिया राबवली जात होती. मात्र, १८ मे २०१९ रोजी टपाल मतपत्रिकांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण देत आयोगाने या प्रक्रियेत बदल केला होता. त्या संदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आले होते. “ईव्हीएम मतमोजणीची उपांत्य फेरी टपाल मतपत्रिकांची गणना पूर्ण झाल्यावरच सुरू करण्याचा निर्देश मागे घेण्यात येत आहे. त्यानुसार, टपाल मतमोजणी कोणत्या टप्प्यावर आहे, याची पर्वा न करता ईव्हीएम मोजणी सुरू ठेवता येईल. ईव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निर्धारित पद्धतीनुसार व्हीव्हीपॅटची मोजणी सुरू करता येईल,” असे आयोगाने या पत्रकात म्हटले होते.

निवडणूक आयोगाने काय कारण सांगितले होते?
मतमोजणी प्रक्रियेत बदल करताना निवडणूक आयोगाने त्यावेळी टपाल मतपत्रिकांमधील वाढीचे कारण दिले होते. ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम’ (ETPBS) सुरू झाल्यामुळे टपाल मतपत्रिकांची संख्या वाढली आहे. या प्रणालीत मतदारांना मतपत्रिका टपालाऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवल्या जातात. मात्र, भरलेली मतपत्रिका पोस्टाद्वारे परत पाठवली जात असल्याने त्याच्या मोजणीला जास्त वेळ लागतो. ईटीपीबीएस मतमोजणीसाठी प्रत्येक मतपत्रिकेवरील क्यूआर कोड (QR Code) वाचण्याची अनिवार्य आवश्यकता असल्याने पोस्टल मतपत्रिकांच्या गणनेला विलंब होतो, असेही आयोगाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेत एकसमानता आणि पूर्ण स्पष्टता राहावी यासाठी नियम बदलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले. “मागील सूचनांनुसार टपाल मतमोजणी कोणत्या टप्प्यावर आहे याची पर्वा न करता ईव्हीएम मतमोजणी सुरू राहू शकत होती. टपाल मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच ईव्हीएम मोजणी पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. साधारणपणे टपाल मतमोजणी ईव्हीएम मतमोजणीपूर्वी पूर्ण होते, तरीदेखील प्रक्रियेत एकसमानता आणि स्पष्टता यावी म्हणून आयोगाने ठरवले आहे की, यापुढे ज्या केंद्रावर टपाल मतमोजणी सुरू आहे, तेथे ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मतमोजणीची उपांत्य फेरी फक्त टपाल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच घेतली जाईल,” असे आयोगाने सांगितले आहे.
आयोगाने मतदारांच्या ऑनलाइन प्रक्रियेत केले बदल
निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आता मतदार म्हणून नाव नोंदणी करायची असल्यास किंवा नाव वगळणे अथवा दुरुस्ती करायची असल्यास अर्जदारांना आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे आपली ओळख पडताळणी करावी लागणार आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या गैरप्रकाराच्या आरोपाआधी अर्जदाराला कोणत्याही ओळखपत्राची पडताळणी न करताच मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांक टाकून निवडणूक आयोगाच्या ॲप्स आणि पोर्टलवर अर्ज करता येत होते. मात्र, मंगळवारपासून ईसीआयनेट पोर्टलवरील फॉर्म ६ (नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी), फॉर्म ७ (नाव वगळण्यासाठी किंवा समाविष्ट करण्यावर आक्षेप घेण्यासाठी) आणि फॉर्म ८ (नाव दुरुस्तीसाठी) भरण्यासाठी ‘ई-साइन’ची अट पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.