पंजाबच्या मनसा जिल्ह्यातील बुढलाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ६६ वर्षीय बुध राम यांना आम आदमी पक्षाने पंजाबच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. शासकीय शाळेचे माजी मुख्याध्यापक राहिलेले बुध राम निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी एप्रिल २०१६ साली आम आदमी पक्षात दाखल झाले होते. आमदारकीची त्यांची ही दुसरी टर्म आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात त्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नव्हते. पण सोमवारी पक्षाने प्रदेश संघटनेत काही बदल केले, ज्यामुळे बुध राम यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री भगवंत मान हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

बुध राम हे ‘प्रिन्सिपल बुध राम’ या नावाने लोकप्रिय आहेत. त्यांनी आजवर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पंजाबी, धर्म आणि शिक्षण अशा विषयांमध्ये पाच पदव्या मिळवलेल्या आहेत. २०१७ साली बुढलाडा या मतदारसंघातून त्यांनी १,२७५ असे छोटे मताधिक्य घेऊन विजय मिळविला होता. काँग्रेसच्या उमेदवार रंजित कौर भाटी यांचा त्यांनी पराभव केला होता. २०२२ साली मात्र त्यांनी ५१,६९१ असे विक्रमी मताधिक्य घेऊन विजय मिळवला. अकाली दलाचे उमेदवार डॉ. निशान सिंग कौलधर यांचा त्यांनी पराभव केला.

दुसऱ्यांदा आमदारकी मिळवल्यानंतर बुध राम यांना शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. बुध राम यांनी पक्षाशी नेहमी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. पक्षात प्रवेश केल्यापासून एखाद्या पदावर वर्णी लागण्यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागली. कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

मनसा जिल्ह्यातील रहिवासी म्हणाले, “मनसा जिल्ह्यातील नेते, आमदार विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आरोग्य मंत्रीपदावरून हटविण्यात आले होते. आता बुध राम यांच्यानिमित्ताने मनसा जिल्ह्याला पुन्हा प्रतिनिधित्व मिळाले आहे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सरकारकडून सोडवून घेण्यात बुध राम यांना यश मिळेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.” मध्यंतरी बुध राम चर्चेत आले होते, ते शाळांना दिलेल्या भेटीमुळे. इयत्ता आठवी आणि दहावीच्या बोर्ड परिक्षेत मनसा जिल्ह्यातील सहा विद्यार्थी बोर्डात आले होते, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी बुध राम यांनी त्यांच्या शाळांना भेटी दिल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बुध राम सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “माझ्या ताटाक बरेच काही वाढून ठेवले आहे, याची मला कल्पना होती. मी परिश्रम घेऊन दिलेली जबाबदारी पार पाडेन. यावर्षी पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्था, महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, तसेच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला बळकटी देऊन निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.”