scorecardresearch

Premium

उत्साह, गोंधळ, सेल्फी घेण्याचा मोह; नव्या संसद भवनात खासदारांचा पहिला दिवस कसा होता?

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने मोदी सरकारने नव्या संसद भवनाच्या इमारतीमधून मंगळवारी (१९ सप्टेंबर) कामाला सुरुवात केली. यावेळी अनेक खासदार पहिल्यांदाच या इमारतीमध्ये आले होते.

New Lok Sabha House Inside
नव्या संसद भवनातील लोकसभा सभागृहात खासदारांचा पहिला दिवस कुतुहलाने भरलेला होता. (Photo – Sansad TV / PTI)

संसदेच्या नव्या इमारतीमध्ये मंगळवारपासून (१९ सप्टेंबर) कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी खासदारांमध्ये उत्साह, काहीसा गोंधळ आणि तक्रारींचा सूर असल्याचे दिसले. मंगळवारी पहिल्यादांच संसदेत प्रवेश केल्यानंतर अनेक खासदारांनी आपली निश्चित केलेली जागा शोधण्यास सुरुवात केली. प्रत्येक खासदाराच्या जागेवर बसवलेली नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे कशी आहेत? हे तपासण्याचा अनेक जण प्रयत्न करीत होते. काही जणांना सभागृहात ठेवलेला सेंगोल (राजदंड) पाहण्याची उत्सुकता लागली होती. तसेच अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या बाजूला लागलेल्या दोन मोठ्या स्क्रीनही खासदार आश्चर्यचकित होऊन पाहत होते. हिरव्या गालिचावर असलेले मोराचे चित्र आणि पक्ष्याच्या आकारात साकारलेले नक्षीदार छत यांबाबत काही खासदारांची चर्चा रंगली होती.

पहिल्या दिवशी खासदारांची हालचाल कशी होती, याचे वर्णन ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधी लिझ मॅथ्यू यांनी आपल्या लेखात केले आहे. मंगळवारी सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक खासदार आपल्या इतर सहकाऱ्यांसमवेत संसदेत सेल्फी घेण्यात, फोटो काढण्यात मग्न होते. काही जण चांगला अँगल मिळावा, संसदेतील नव्या कलाकृती फोटोमध्ये कैद करता याव्यात, असा प्रयत्न करीत होते, असे निरीक्षण मॅथ्यू यांनी नोंदविले आहे.

modi talk with student delhi
महिला विधेयकातून देशाचे नवे भवितव्य; रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचे प्रतिपादन
narendra modi
संसद प्रवेशाचा उत्साही सोहळा; जुन्या संसद भवनाला निरोप देताना गप्पा आणि हास्यविनोद
opposition_meeting
इंडिया आघाडीत राज्यस्तरावर जागा वाटप, पहिली सभा भोपाळमध्ये!
new parliemant building
संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर

हे वाचा >> संसदेची जुनी इमारत उभारण्यासाठी ‘६४ योगिनी मंदिरा’कडून प्रेरणा? सत्य काय? जाणून घ्या सविस्तर

काँग्रेस पक्षातील अनेक खासदार राहुल गांधी यांच्यासह फोटो काढण्यास उत्सुक असल्याचे दिसले. राहुल गांधी मात्र काँग्रेस पक्षातील सहकारी के. सुरेश यांच्यासमवेत काहीतरी गंभीर विषयावर चर्चा करताना आढळले. हातवारे करून ते काहीतरी विषय समजावून सांगत होते. तोपर्यंत इतर काँग्रेस खासदार राहुल गांधी फोटोसाठी उपलब्ध होण्याची वाट पाहताना दिसले. सोमवारी सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी पहिल्याच रांगेत बसलेल्या दिसल्या होत्या; त्या मंगळवारी मात्र उपस्थित नव्हत्या.

यावेळी काही गमतीशीर प्रसंगही घडले. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव शुक्ला आणि रजनी पाटील हे चुकून लोकसभेच्या सभागृहात शिरले. त्यामुळे त्यांना पाहून लोकसभेतील खासदारांमध्ये एकच हशा पिकला. जेव्हा शुक्ला आणि पाटील यांना आपण चुकून लोकसभेत आलो असल्याचे कळले, तेव्हा त्यांनीही तिथून लगेचच काढता पाय घेतला. नव्या संसदेतील प्रेक्षक गॅलरीमध्ये पहिल्या दिवशी अभिनेत्री कंगना रणौत उपस्थित होती. महिला आरक्षणाच्या विधेयकावरील चर्चेची साक्षीदार होण्यासाठी कंगना रणौत उपस्थित असल्याचे कळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह जेव्हा लोकसभेत आले, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर मंत्र्यांनी, तसेच भाजपा खासदारांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. विरोधकांमध्ये मात्र यावेळी फारसा उत्साह दिसला नाही. तर प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या महिलांकडून ‘मोदी’, ‘मोदी’ अशा घोषणा झाल्या. या घोषणा ऐकून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या जागेवरून उठत विरोधकांनी हे काय आहे? काय चाललंय? असे प्रश्न गॅलरीच्या दिशेने हातवारे करून विचारले. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या मंत्र्यांना इशारा करून गॅलरीमध्ये शांतता राखायला सांगा, असे निर्देश सोडले. लगेचच अमित शाह यांनी गजेंद्र शेखावत व अनुराग ठाकूर या दोन मंत्र्यांना बोलावून घेतले आणि गॅलरीमध्ये बसलेल्या महिलांना शांत राहण्यास सांगा, अशी सूचना देण्यास सांगितले.

हे वाचा >> “माझ्या कारकिर्दीतही विरोधक गोंधळ घालायचे; पण त्यांनी कधी अपमान केला नाही”; सुमित्रा महाजन यांनी सांगितल्या आठवणी

महिलांना संसद आणि विधिमंडळात आरक्षण देणारे विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर करताच सत्ताधारी बाकावरून एकच जल्लोष करण्यात आला. जुन्या संसदेप्रमाणे येथेही सरकारच्या बाजूने नारेबाजी; तर विरोधकांकडून निषेधाच्या घोषणा ऐकू आल्या. यावेळी काँग्रेसचे सभागृहनेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, २०१० साली राज्यसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक अद्यापही शाबूत आहे; मग नवे विधेयक कसे? त्यावर अमित शाह आणि इतर मंत्र्यांनी जोरदार आक्षेप घेत, चौधरी यांचा निषेध केला. मंत्र्यांकडून निषेध होत असल्याचे पाहून मागे बसलेल्या काँग्रेसच्या खासदारांनीही चेव येऊन मंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. “खाली बसा, चौधरी यांचे म्हणणे ऐकून घ्या”, असे मोठमोठ्याने काँग्रेसचे खासदार सांगत होते.

अमित शाह यांनी चौधरी यांना उत्तर देत असताना त्यांची माहिती वस्तुस्थितीला धरून नाही, असे म्हटले. २०१० साली राज्यसभेत मंजूर झालेले विधेयक पुढील कार्यवाहीसाठी लोकसभेत सादर करण्यात आले; मात्र काही कारणांमुळे ते मंजूर झाले नाही. जशी १५ वी लोकसभा विसर्जित झाली, तसे हे विधेयकही विसर्जित झाले होते. त्यावर चौधरी यांनी पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र यावेळी त्यांचा माईक बंद झाल्यामुळे त्यांचा आवाज येऊ शकला नाही. मग विरोधकांनी घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला.

काँग्रेसच्या खासदारांनी पहिल्याच दिवशी सभागृहाच्या मध्यभागी मोकळ्या जागेत उतरून, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. “चालणार नाही, चालणार नाही, सरकारची तानाशाही चालणार नाही”, अशा घोषणा दिल्यानंतर अखेर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मध्यस्थी करीत लोकसभा कर्मचाऱ्यांना माईक सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.

माईकचा गोंधळ क्षमत नाही तोपर्यंत आणखी एक गोंधळ झाला. कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडण्यासाठी उभे राहताच, विरोधकांनी त्यांना विधेयकाची प्रतच मिळाली नसल्याची तक्रार केली. विधेयक कुठे आहे? एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारणा केली. अखेर अध्यक्षांनी सांगितले की, १२८ वी राज्यघटना दुरुस्ती विधेयकाची प्रत सदस्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. सदस्यांनी त्यांच्या जागेवर असलेल्या टॅबलेटवरून ही डिजिटल प्रत पाहावी.

आणखी वाचा >> “एकेकाळी पंडित नेहरुंच्या हाती असलेला सेंगॉल..”, नव्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं भाष्य

तथापि, अनेक खासदारांना टॅबलेटवर खासदारांचे पोर्टल कसे उघडावे, याची कल्पना नव्हती. ओवेसी यांनी आपली तक्रार रेटून धरल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे पळत पळत ओवेसी यांच्या जागेवर गेले आणि त्यांनी पोर्टल कसे सुरू करावे, याची माहिती दिली. त्यानंतर दुबे यांनी अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि द्रमुकचे खासदार टी. आर. बाळू यांच्यासह इतर वरिष्ठ खासदारांनाही मदत केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Excitement confusion photo session how was the mps first day in the new parliament building kvg

First published on: 20-09-2023 at 15:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×