Top Five Political News in Today : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचं श्रेय माझं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले. जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंचं आर्थिक बळ आहे का? या प्रश्नावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आणि पूरग्रस्तांच्या मदत कीटवर उपमुख्यमंत्र्यांचा फोटोनेही नवा वाद निर्माण झाला. महाराष्ट्रात आज दिवसभरात घडलेल्या या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचं श्रेय माझं”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १९ वर्षांनी ५ जुलै २०२५ ला एकत्र आले. हिंदी भाषेची सक्ती नको म्हणत दोन्ही पक्षांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर आले. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. यावर एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलले.

ते म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं श्रेय माझंच आहे, मी ते आधीच घेतलं आहे. शिवाय त्यांनीही मला श्रेय दिलं आहे. लोक म्हणतात तुम्ही पक्ष फोडले, कुटुंबांमध्ये कलह घडवला. मी असं काहीही केलेलं नाही. आता लोक जर असं म्हणत असतील ठाकरे तुमच्यामुळे एकत्र आले तर त्याचं श्रेय तर मी घेणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, त्यांनी एकत्र यावं, लढावं काही प्रश्न नाही,” असेही ते म्हणाले.

जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंचं आर्थिक बळ?

देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी न्यूजला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांना निधी कोण देतं? असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “मनोज जरांगेंना कोण निधी पुरवतं त्याची माहिती आमच्याकडे येत असते. मात्र, कुठली यादी वगैरे काही नाही, मी त्यावर फार बोलणार नाही. मात्र एकनाथ शिंदे, अजित पवार हे कायमच माझ्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या लोकांनी मनोज जरांगेंना पैसे पुरवले अशी कुठलीही माहिती माझ्याकडे आलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवरून रोहित पवारांचे सरकारवर टीकास्त्र

लातूर, धाराशिव, बीड व परभणी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक भागांत खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी मराठवाडा भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “मा. फडणवीस साहेब, अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्याला “हेक्टरी किती मदत देताय?” हा प्रश्न आपल्याला राजकारण वाटत आहे. मानलं तुमच्या संवेदनशिलतेला. अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे, हेक्टरी ५० हजार मदत आणि ओल्या दुष्काळाची घोषणा. परंतु, आपण मात्र हेक्टरी ५० हजार मदत आणि ओला दुष्काळ सोडून कोरड्या घोषणा करत आहात. शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्यायला गेला आहात तर शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्या, उगाच नावाला दौरे करू नका.”

आणखी एका पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ” मायबाप सरकार बघताय ना, जगाचं पोट भरणाऱ्या बळीराजानं आता जगायचं कसं? शेतकरी लाचार नाही. स्वाभिमानी आहे, पण निसर्ग कोपल्याने त्याचं सर्वस्व वाहून गेलंय. स्वप्नांचा चिखल झालाय..! संवेदनशीलपणा दाखवून तातडीने कर्जमाफी करा आणि उपकार केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात ७ हजार रुपये न टेकवता हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा,” असे ते म्हणाले.

पूरग्रस्तांच्या मदत कीटवर उपमुख्यमंत्र्यांचा फोटोने वाद

लातूर, धाराशिव, बीड व परभणी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक भागांत खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. विरोधक त्यावरून सातत्याने सत्ताधारी भाजपावर टीका करताना दिसत आहेत. सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदत कीटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. “अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवरील एकनाथ शिंदेसाहेब आणि ‘रॅपिडो’फेम मंत्री प्रताप सरनाईक यांच्या फोटोंची साईज खूप लहान असून, यापुढे हे फोटो मोठ्या आकारात छापावेत, म्हणजे लोकांच्या डोळ्यांतले दुःखाश्रू थांबतील आणि लोक फोटो बघून आनंदाने हसतील, ” असे रोहित पवार म्हणाले.

ओबीसी समाजाचे उपोषण; ‘हैदराबाद गॅझेट’ रद्द करण्याची मागणी

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ही मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली. मात्र, ही मागणी मान्य झाल्यापासून ओबीसी समाज याला कडाडून विरोध करत आहे. नागपूर येथे २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने कुडाळ येथे दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलन सुरू केले आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ विविध ओबीसी समाजांचे प्रतिनिधी सहभागी झाले. सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते ओबीसी कोट्यातून नसावे.” त्यांनी ‘हैदराबाद गॅझेट’ रद्द करण्याची मागणी केली.