अविनाश पाटील
नाशिक : हे सरकार तुमचं आहे… सर्वसामान्यांचं आहे…शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे…याचा आपल्या प्रत्येक भाषणात उल्लेख करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी नाशिक जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात धावतपळत केलेली पीक नुकसानी पाहणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अंधारात सत्तार यांनी नेमकी कोणती पाहणी केली, असा प्रश्न शेतकरी विचारु लागले असून सत्तार यांचा हा धावता दौरा शेतकऱ्यांपेक्षा विरोधकांना टीकेसाठी अधिक पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
नाशिक जिल्ह्यास यंदा सातत्याने अवकाळीच्या संकटास सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि सततचे ढगाळ हवामान यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील अवकाळीत जिल्ह्यात २६८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाचा परिणाम घाऊक बाजारातील कांदा आवकेवर झाला आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकांना बसणार आहे. सध्या अनेक भागात द्राक्ष परिपक्व झाले असून काही ठिकाणी होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी छाटणी सुरू आहे. पावसाने द्राक्षमण्यांना तडे जाण्याचे प्रकार घडत आहेत. यंदा द्राक्षाला चांगले भाव होते. नैसर्गिक संकटाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याची भीती द्राक्ष बागाईतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी व्यक्त केली आहे. ओलसर निर्यातक्षम द्राक्ष निर्यातदार खुडत नाही.
हेही वाचा >>> सांगलीचे राजकारणही प्रदूषित?
पावसाच्या कचाट्यात सापडलेल्या बागेतील द्राक्षांना तडे जातात की नाही, हे पुढील काही दिवसात लक्षात येते. त्यामुळे नुकसानीचा लगेच अंदाजही येत नसल्याने द्राक्ष उत्पादकांसाठी पंचनाम्यांदरम्यान ते अडचणीचे ठरत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले. याच काळात अवकाळी पाऊस व काही भागात गारपीट झाल्याने कर्मचाऱ्यांनी संपातही पंचनाम्यांसाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यात नैसर्गिक संकटाने सुमारे पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाने निफाड, नाशिक, येवला, नांदगाव, सुरगाणा, पेठ आणि कळवण या तालुक्यांमध्ये पाच ते १४ मार्च या कालावधीत ५१५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तर १५ ते १७ या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ३०३६ हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. गेल्या शनिवार व रविवारी झालेल्या पावसात निफाड व पेठ तालुक्यात झालेल्या सुमारे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने इच्छुकांची घालमेल
अवकाळीने नाशिकसह राज्यातील इतर भागात धुमाकूळ घातला असताना मुख्यमंत्री भाषणे ठोकण्यात मग्न असून त्यांच्यासह इतर मंत्र्यांना बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्यास वेळ नसल्याचे टिकास्र ठाकरे गटाने सोडल्यानंतर सत्ताधारी शिवसेना अर्थात शिंदे गट खडबडून जागा झाला. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले. परंतु, नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने ते सायंकाळी साडेसात म्हणजे अंधारातच सर्वप्रथम निफाड तालुक्यातील कुंभारी येथे बांधावर पोहचले. एकाच द्राक्षबागेची अंधारातच पाहणी करुन सत्तार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. द्राक्ष पिकासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे द्राक्षबागांसाठी आच्छादन योजना लागू केली असती तर ही वेळ आली नसती, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. या संकटातून सावरणे कठीण असल्याने शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. एका शेतकऱ्याने तर थेट गांजाची शेती करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.
चांदवड तालुक्यातील पन्हाळे येथेही सत्तार यांनी पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पन्हाळे येथे रात्री नऊ वाजता ते पोहचले. या ठिकाणी एका शेतकऱ्याने काही महिन्यांपूर्वी सोयाबीनचे नुकसान झाले, त्याची भरपाईही अजून मिळाली नसल्याचा मुद्दा मांडला. प्रत्येक ठिकाणी सत्तार हे अधिवेशन सुरू असल्यामुळे लगेच काही काही आश्वासन देता येणार नसून मुख्यमंत्र्यांसमोर सर्व परिस्थिती मांडल्यावर तेच मदतीची घोषणा करतील, एवढेच सांगत राहिले. शेतकऱ्यांनी एखादी मागणी केल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, ही त्यांची कॅसेट कायम सुरु राहिल्याने शेतकरीही वैतागले. सत्तार यांच्या या अंधारातील धावत्या दौऱ्यातून आपल्या पदरी काही पडणार की नाही, याची धास्ती त्यांना आहे. रानवड येथे तर सत्तार निघून गेल्यावर शेतकऱ्यांनी पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या. सत्तार यांना पाहणी करण्यासाठी वेळ नव्हता तर, ते आलेच कशाला, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागल्याने हा दौरा विरोधकांसाठी आयतेच कोलीत देवून गेल्याचे चिन्ह आहे.