शरद पवार यांना आपण आपले गुरू मानतो. तसेच, पवारांमुळेच आपण राजकारणात आल्याची कृतज्ञताही सुशीलकुमार शिंदे व्यक्त करतात. पण, त्याच पवार आणि शिंदे यांच्या पुढील पिढीत सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून चांगलीच जुंपली आहे. इतके की पवारांच्या पुढील पिढीचा पोरकटपणा, असा जाहीर उल्लेख शिंदे यांच्या कन्येने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे राज्यात काँग्रेसमध्येच वाद पेटला असताना इकडे सोलापुरात आगामी लोकसभेची जागा काँग्रेसने लढवायची की राष्ट्रवादीने, यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये दुसऱ्या फळीत वाढलेला वाद आता चांगलाच उफाळून आला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर कालपर्यंत हा वाद स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये मर्यादित होता. यात आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी उडी घेतल्यानंतर आव्हान-प्रतिआव्हान देत दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून अक्षरशः पोरखेळ चालविल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे वंदे भारत एक्स्प्रेस सेवेच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर

राज्यात आणि केंद्रात सुमारे ४० वर्षे सत्ताकारण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मागील २०१४ आणि २०१९ साली मोदी लाटेत सलग दोनवेळा सोलापूर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेवढेच निमित्त पुढे करून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता सोलापूरची जागा काँग्रेसने न लढविता राष्ट्रवादीला सोडावी, असा आग्रह धरला आहे. इथपर्यंत ही मागणी तशी अजिबात दखलपात्र नव्हती. परंतु, जेव्हा राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी मागील आठवड्यात सोलापूर भेटीप्रसंगी, सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसने लढवायची, की राष्ट्रवादीने याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे विधान केल्यानंतर राष्ट्रवादीला स्थानिक पातळीवर बळ मिळाले. तर तिकडे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

या वादात शेवटी सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असतानाही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा ओलांडून आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आव्हानाची भाषा सुरू केली. यात भर म्हणून सुशीलकुमारांच्या कन्या तथा प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनीही अनपेक्षितपणे वादात उडी मारली. कोण रोहित पवार? मला माहीत नाही. त्यांना आमदारकीचा पहिलाच अनुभव आहे. काही जणांमध्ये पोरकटपणा असतो. हा पोरकटपणा जाऊन पोक्तपणा यायला आणखी थोडा काळ लागेल, अशा शब्दांत आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांची चांगलीच खिल्ली उडविली. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी मात्र, आमदार प्रणिती शिंदे माझ्या थोरल्या भगिनी आहेत. त्यांना माझ्याविषयी बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे, कोणीही पक्ष कार्यकर्त्याने वाद घालू नये. सोलापूर लोकसभेच्या जागेविषयी महाविकास आघाडीच्या बैठकीत दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, एवढे आपण बोललो होतो. याशिवाय दुसरा कोणताही दावा केला नव्हता, असे संयमी भाषेत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र तत्पूर्वी, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आततायीपणा करून काँग्रेस भवनावर धडक मारून तेथे रोहित पवार यांची ‘ओळख ‘ करून देणारे फलक झळकावले. त्यास प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी कार्यालयासमोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमा असलेले फलक उभारले. हा खरोखर पोरखेळ ठरला.

हेही वाचा – अग्रलेख : राजभवनातील राधाक्का!

दोन्ही काँग्रेसमधील या वाकयुद्धात सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्या योगायोगाने झालेल्या सोलापूर भेटीत ‘चाय पे’ चर्चेसाठी आपल्या ‘जनवात्सल्य’ निवासस्थानी आमंत्रित केले. त्यानुसार सुशीलकुमारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबरोबर जयंत पाटील यांनी ‘चाय पे चर्चा’ केली. पण, ही अर्ध्या तासाची चर्चा बंद दाराआड झाली. नंतर यात कोणताही राजकीय विषय नव्हता. केवळ वैयक्तिक ख्यालीखुशालीच्या कौटुंबिक गप्पा झाल्याची सारवासारव दोन्ही नेत्यांना करावी लागली. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सोलापुरात संपर्क वाढला असताना लोकसभेच्या जागेचा वाद उफाळून आल्यामुळे त्याविषयी तर्कवितर्क केले जात आहेत.

‘आमदार प्रणिती शिंदे यांनी या वादात स्वतः पडण्याची गरज नव्हती. उलट यातून पिता सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याच्या जाणिवेतून त्यांनी पोक्तपणा दाखविणे अभिप्रेत होते. पण, आगामी लोकसभा निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढविण्याचा त्यांचा हेतू दिसतो. त्यांच्या अशा वागण्यामुळेच सोलापुरात काँग्रेसची ताकद क्षीण होत आहे. वैयक्तिक राजकीय बस्तान कायम राखण्यासाठी शेजारच्या विधानसभेच्या जागा प्रणिती शिंदे यांनी भाजपाला जणू गहाणखात करून दिले आहे’, अशी विखारी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केली आहे.

असा हा वाद पेटत असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपाचा मार्ग मोकळा होत आहे, हे पुन्हा वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण आगामी लोकसभा आणि विधानसभांसह महापालिका निवडणुकांची नियोजनबद्ध तयारी भाजपाने करायला यापूर्वीच सुरुवात केली आहे. सोलापूर-मुंबई-सोलापूरसाठी सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून भाजपाने जाणीवपूर्वक स्वतःच्या राजकीय भांडवलात भर घालण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मितीचा मार्ग सुकर केला आहे. याउलट, भाजपाविरोधात अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवून वातावरण तापविण्याची संधी वाया घालवून दोन्ही काँग्रेसने आपापसातील वाद घालणे हे जाणीवपूर्वक आहे, की याला राजकीय बेफिकिरीचे आणि बेजबाबदारपणाचे लक्षण म्हणायचे?

अखेर दोन्ही काँग्रेसचे मनोमिलन

सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसने लढवायची, की राष्ट्रवादीने, यावरून दोन्ही मित्र पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर वाढलेला वाद चांगलाच उफाळला आणि एकमेकांच्या कार्यालयांवर धडक देऊन आव्हान- प्रतिआव्हान देण्यापर्यंत मजल गेली असताना अखेर दोन्ही पक्षांना सबुरीने घेण्याची उपरती आली आहे. वरिष्ठ नेत्यांनी कान पिळल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले. दोन्ही मित्र पक्षांनी आपापसात लढण्यापेक्षा प्रमुख शत्रू असलेल्या भाजपाशी लढण्यावर एकमत झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between next generation of sharad pawar and sushilkumar shinde over solapur lok sabha constituency print politics news ssb
First published on: 12-02-2023 at 10:07 IST