लोकसभा निवडणुकीच्या दुसरा टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दिवसभरात महाराष्ट्रात विविध मतदारसंघात जाहीर सभा पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“अमरावतीमध्ये आज या ठिकाणी सर्वांत मोठी सभा होत आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हातात द्यायचा, याचा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. त्यामुळे आता जनतेला निर्णय घ्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रासप, मनसे असे वेगवेगळे पक्ष आहेत. असे वेगवेगळ्या पक्षांबरोबर आपली महायुती आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : “बाप एक नंबरी बेटा दस नंबरी”; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका
“राहुल गांधी यांच्याकडे २६ पक्षांची खिचडी आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांच्या आघाडीतील पक्ष नेते मानायला तयार नाहीत. त्यांच्याच आघाडीमधील एक नेते राहुल गांधी हे अपरिपक्व असल्याचे म्हणाले. ते असेही म्हणाले की, राहुल गांधी देशाचे नेतृत्व करु शकत नाहीत. आता सांगा त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे. राहुल गांधी यांना नेता मानायला शरद पवार आणि उद्धव ठाकरेही तयार नाहीत. संजय राऊत यांनी तर घोषित करुन टाकले की, उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होतील. मला सांगा ज्यांचा एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाही, ते कधी देशाचे पंतप्रधान होतील का?”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शरद पवारांनी माफी मागावी…
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार अमरावतीत आले होते. तेव्हा ते म्हणाले, मागच्या निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा दिला म्हणून माफी मागतो. पण शरद पवार साहेब तुम्हाला जर माफी मागायची असेल तर तुम्ही सातत्यांनी विदर्भावर अन्याय केला. तुम्ही अमरावतीवर अन्याय केला. आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमरावतीत टेक्सटाईल पार्क आला, विमानतळाला गती मिळाली, क्रिडा विद्यापीठ आले, अमरावतीत विकासाला सुरुवात झाली, त्यामुळे जर माफी मागायची असेल तर या जनतेची माफी मागा”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.