प्रमोद खडसे

वाशीम : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांचा दौरा करीत शिवसैनिकांशी संवाद साधला. पोहरादेवीचे दर्शन घेऊन दिग्रस येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. खासदार अरविंद सांवत यांनी जाहीर सभेतच माजी मंत्री संजय देशमुख यांना आमदार करणार असल्याचे सांगितले. यामुळे विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी मंत्री संजय देशमुख यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, खासदार भावना गवळी यांच्याविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार कोण, यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. संजय देशमुख यांचे वाशीम व यवतमाळ जिल्ह्यातील दौरे आणि बैठका वाढल्याने लोकसभा निवडणुकीत खासदार गवळींविरोधात तेच उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, खासदार अरविंद सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच देशमुखांना आमदार करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे त्या चर्चेवर पडदा पडला. आता विधानसभा निवडणुकीत राठोड यांच्याविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हेच असतील, असे तूर्त मानले जात आहे.

हेही वाचा… कोल्हापुरात ठाकरे गटाचा स्वपक्षीय उमेदवारीचा आग्रह

हेही वाचा… बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरमध्ये भाजप नेत्यांची कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यवतमाळ आणि वाशीम हे दोन्ही जिल्हे संजय राठोड आणि भावना गवळी यांचे बालेकिल्ला मानले जातात. हे दोन्ही नेते पूर्वाश्रमिचे शिवसैनिकच. आता ते शिंदे गटात सामील झाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला या दोघांच्याविरोधात बलाढ्य उमेदवार शोधावा लागणार आहे.