राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गुरुवारी (३ ऑगस्ट) हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर टीका केली. फेब्रुवारी २०२३ मध्ये राजस्थानमधील दोन युवक नासीर आणि जुनैद यांची हरियाणामधील भिवानी जिल्ह्यात हत्या झाली होती. या हत्येच्या तपास प्रकरणात हरियाणा पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप गहलोत यांनी केला आहे.

ट्विटरवर गहलोत यांनी लिहिले, “हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत असताना राजस्थान पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण राजस्थान पोलिस जेव्हा नासीर-जुनैदच्या मारेकऱ्याला अटक करण्यासाठी हरियाणामध्ये पोहोचले, तेव्हा हरियाणा पोलिसांनी सहकार्य केले नाही. उलट राजस्थानच्या पोलिसांवरच एफआयआर दाखल केला. सध्या फरार असलेल्या खऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी हरियाणा पोलिस राजस्थान पोलिसांना सहकार्य करत नाहीत.”

नासीर (२५) आणि जुनैद (३५) हे दोघेही राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील घाटमीका गावातील रहिवासी होते. गाईची तस्करी केल्याच्या संशयाखाली त्यांचे १५ फेब्रुवारी रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यात दोघांचेही मृतदेह एका गाडीत जळाळेल्या अवस्थेत आढळून आले.

हे वाचा >> हरियाणामध्ये जळालेल्या बोलेरो गाडीत दोन युवकांचे मृतदेह आढळले; युवकांच्या कुटुंबियांचा बजरंग दलावर हत्येचा आरोप

अशोक गहलोत पुढे म्हणाले की, हरियाणामधील हिंसाचार थांबविण्यात अपयश आल्यामुळेच भाजपाकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. ज्याचा उद्देश लोकांचे लक्ष विचलित करणे हा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी (३१ जुलै) हरियाणा राज्यातील नूह जिल्ह्यात मोठ्या दोन गटात हिंसाचार उफाळला होता. धार्मिक तणावातून हा हिंसाचार उसळल्यामुळे शासन आणि प्रशासनावर जोरदार टीका झाली. जुनैद आणि नासीर यांच्या हत्येमध्ये तथाकथित संशयित आरोपी मोनू मानेसर हाच हरियाणामधील हिंसाचार भडकण्यास कारणीभूत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. त्यामुळे हरियाणा आणि राजस्थानमध्ये शाब्दिक चकमक उडल्याचे पाहायला मिळाले.