George Fernandes fight for Democracy : २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना अटक होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हे इंदिरा गांधी यांच्या रडारवर आले होते. कुठल्याही परिस्थिती जॉर्ज यांना अटक करायची असा चंगच त्यांनी बांधला होता, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या सात गुप्तचर संस्थांना इंदिरा गांधी यांनी कामाला लावले होते. मात्र, जॉर्ज हे सर्वांनाच चकवून भूमिगत झाले. आणीबाणीची घोषणा झाली, तेव्हा जॉर्ज फर्नांडिस दिल्लीमध्ये नव्हते. ते ऑडिशामधील गोपाळपूर या सागरी गावात त्यांची पत्नी लिला आणि १७ महिन्यांचा मुलगा सुशांतोबरोबर राहत होते. विरोधी पक्षातील नेत्यांच्या अटकेची माहिती त्यांना आधीच मिळाली होती.
जनता पार्टीचे नेते जयप्रकाश नारायण यांना दिल्लीतील गांधी पीस फाऊंडेशनमधून रात्री ३ वाजता अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेची बातमी कळताच जॉर्ज यांनी भूमिगत होण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि मुलापासून आपल्याला २२ महिने दूर राहावे लागेल, याची कल्पना जॉर्ज यांनी कधीच केली नव्हती. मात्र, त्यांना हे ठाऊक होतं की, ते दोघेही पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनवरून गावाकडे जाणार आहेत. यादरम्यान जॉर्ज यांनी एका व्यक्तीमार्फत त्यांच्या पत्नीपर्यंत एक चिठ्ठी पोहोचवली. “मला माहिती नाही हे सगळं कुठपर्यंत जाऊन थांबेल; पण आपला मुलगा तुझ्याबरोबर नेहमीच असेल,” असं जॉर्ज यांनी या चिठ्ठीत नमूद केल्याचा उल्लेख मायकेल हेंडरसन यांच्या ‘Experiment with Untruth: India Under Emergency’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
भूमिगत झाल्यानंतर जॉर्ज हे वेगवेगळ्या वेशभूषेत वावरत होते. अटकेपासून वाचण्यासाठी ते आपली ठिकाणं सातत्याने बदलत राहिले. सुरुवातीला जॉर्ज यांनी दाढी वाढवली आणि अनेकदा स्वतःची ओळख शीख म्हणून करून दिली. विमानाने प्रवास करीत असताना ते सरदार म्हणून वावरत असायचे, तर गावांमध्ये ते स्वतःला भिक्षुक म्हणून सांगायचे. जॉर्ज यांनी त्यांचा जाड फ्रेमचा चष्मा सोडून पातळ फ्रेमचा चष्मा वापरायला सुरुवात केली होती. कधी ते मित्रांच्या घरी राहत होते, तर कधी भाड्याने घर घेऊन राहायचे.
आणखी वाचा : संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना कोण होत्या? आणीबाणीत १३ हजार पुरुषांची नसबंदी कुणी केली?
कोण होते जॉर्ज फर्नांडिस?
- राम मनोहर लोहिया यांच्या विचारसरणीने प्रेरित झालेले जॉर्ज हे एक आक्रमक समाजवादी नेते होते.
- सुरुवातीच्या काळात त्यांनी कामगार चळवळीत मोठं योगदान दिलं.
- मुंबईतील टॅक्सीचालक आणि रेल्वे कामगारांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय झाले होते.
- इंदिरा गांधी आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यातील संबंध कधीच गोड नव्हते.
- १९६७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज यांनी मुंबईतून विजय मिळविला.
- काँग्रेसचे दिग्गज नेते एस. के. पाटील यांचा पराभव केल्याने त्यांना ‘जायंट किलर’ अशी उपाधी मिळाली.
- इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या कार्यकाळात जॉर्ज हे काँग्रेसविरोधी राजकारणाचे प्रमुख होते.
जॉर्ज फर्नांडिस यांनी घडवून आणला होता रेल्वेचा संप
१९७४ मध्ये अखिल भारतीय रेल्वे कामगार संघटनेचे प्रमुख म्हणून जॉर्ज यांनी तब्बल १७ लाख कामगारांना एकत्रित करून तीन आठवड्यांचा देशव्यापी संप घडवून आणला, ज्यामुळे संपूर्ण रेल्वे व्यवस्था ठप्प झाली. त्या काळात इंदिरा गांधी बिहारमधील जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाशी झुंजत होत्या, त्यामुळे हा संप त्यांच्या सरकार विरोधातील कटाचाच एक भाग आहे, असं त्यांना वाटलं. हाच क्षण काँग्रेसच्या ऱ्हासाच्या दिशेने एक निर्णायक वळण ठरला. भूमिगत असतानाही जॉर्ज यांनी रेल्वे कामगारांसाठी पत्रके लिहिणं सुरू ठेवलं आणि त्यांना स्वातंत्र्याच्या या महान आणि रोमांचक लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. इंदिरा गांधींच्या हुकूमशाही शासनाला प्रतिकार करू शकेल, असे भूमिगत नेटवर्क तयार करण्याचा उद्देश जॉर्ज यांचा होता. केंद्र सरकारने काढलेल्या ‘Why Emergency’ या श्वेतपत्रात स्पष्ट केलं होतं की, रेल्वे संपामुळेच आणीबाणी घोषित करावी लागली होती.
१९७६ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना अटक
जवळपास एक वर्ष भूमिगत राहिल्यानंतर अखेर १० जून १९७६ रोजी कोलकाता येथील एका चर्चच्या आवारातून जॉर्ज फर्नांडिस यांना अटक करण्यात आली. त्यांना तत्काळ ट्रान्सपोर्ट विमानाने दिल्लीला आणण्यात आले आणि थेट लाल किल्ल्यावर नेण्यात आले. त्यानंतर हरियाणामधील हिसार कारागृहात जॉर्ज यांची रवानगी करण्यात आली. त्यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले, ती एखाद्या पिंजऱ्यासारखीच होती, जिथे जून महिन्याच्या तप्त वाऱ्यांचा थेट मारा होत असे, असं फर्नांडिस यांनी नंतर सांगितलं. त्यावेळी अशीही चर्चा होत होती की, जॉर्ज यांना झोपू न देण्यासाठी त्यांच्या कोठडीत प्रखर प्रकाश केला जात होता.
अनेकांचं मत होतं की, सोशलिस्ट इंटरनॅशनल आणि युरोपातील काही आघाडीच्या नेत्यांच्या हस्तक्षेपामुळेच फर्नांडिस यांचा जीव वाचला. ऑस्ट्रियन लेखक हान्स जानिचेक, जे सोशलिस्ट इंटरनॅशनलचे महासचिव होते, त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, फर्नांडिस यांच्या जीवाला धोका आहे. त्या काळी जर्मन सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष विली ब्रँड्ट, ऑस्ट्रियाचे चांसलर ब्रूनो क्रायस्की, स्वीडनचे पंतप्रधान ओलोफ पाल्मे आणि फ्रान्सचे समाजवादी नेते फ्रॉन्स्वा मितेराँ या सर्वांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आवाहन केलं की, भारताच्या लोकशाही प्रतिमेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा.

४ ऑक्टोबर १९७६ रोजी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बारोदा डायनामाइट खटल्यात सरकार विरोधात स्फोटकांचा वापर करून भीती निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना बेड्या घालून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी घेतलेली त्यांची छायाचित्र भारताच्या लोकशाही इतिहासातील न विसरता येणाऱ्या क्षणांपैकी एक ठरली. न्यायालयात त्यांनी हात उंचावून जाहीर केलं, “या बेड्या ही त्या राष्ट्राची प्रतिकं आहेत, ज्याला गुलाम केलं गेलं आहे.”
आक्रमक फर्नांडिस ते ‘जॉर्ज साहेब’
१९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनी अचानक लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. त्यावेळी जॉर्ज यांनी या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. मात्र, लवकरच विरोधी पक्षांनी त्यांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी तयार केलं आणि त्यांनी तुरुंगात असतानाच १९७७ मधील लोकसभा निवडणूक लढवली. बिहारमधील मुजफ्फरपूर मतदारसंघातून जनता पक्षाच्या उमेदवारीवर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सुमारे तीन लाख मतांनी पराभव केला. उत्तर भारतात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि इंदिरा गांधींनाही रायबरेलीसारख्या त्यांच्या मजबूत मतदारसंघात हार पत्करावी लागली.
हेही वाचा : जेपींना लाठ्यांपासून वाचवणारी ‘अदृश्य ढाल’, जाणून घ्या नानाजी देशमुख यांची कथा
जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर जॉर्ज यांची सुटका
निवडणूक निकालानंतर लगेचच जॉर्ज फर्नांडिस यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यांच्यावरील बारोदा डायनामाइट खटला मागे घेण्यात आला. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या काँग्रेसविरोधी सरकारमध्ये ते सहभागी झाले होते. आक्रमक प्रतिमा असलेले फर्नांडिस हळहळू शांत झाले आणि ‘जॉर्ज साहेब’ म्हणून त्यांना राजकारणात नवी ओळख मिळाली. मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी या काँग्रेसविरोधी पंतप्रधानांच्या काळात जॉर्ज यांनी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांनी दूरसंचार, उद्योग, रेल्वे आणि संरक्षण मंत्रालय यांसारख्या उच्चपदांवर काम केलं.
जॉर्ज फर्नांडिस यांची काँग्रेसविरोधी भूमिका
काँग्रेसविरोधी भूमिका कायम ठेवणाऱ्या फर्नांडिस यांनी पुढील काळात १९९८ ते २००४ दरम्यान भाजपा नेतृत्वाखालील एनडीएशी हातमिळवणी केली. इंदिरा गांधींपासून सोनिया गांधींपर्यंत काँग्रेस पक्षाने त्यांच्याबद्दल कायम नाराजीची भूमिका घेतली. जॉर्ज फर्नांडिस यांचे भारतीय लोकशाहीतील योगदान हे तीन गोष्टींतून मोजता येते, पहिलं- समाजाच्या काठावर फेकल्या गेलेल्या गरिबांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. दुसरं- आणीबाणीनंतर मूलभूत अधिकारांची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. तिसरं म्हणजे- काँग्रेसच्या वर्चस्वाला पर्याय उभे करण्यासाठी त्यांनी नवे राजकीय मार्ग तयार केले.