कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ असलेल्या गोकुळच्या निवडणुकीला वर्षभराचा अवधी असला तरी आतापासूनच या निवडणुकीतचे अर्थपूर्ण बाण उडू लागले आहेत. गोकुळच्या नेतृत्वाची धुरा असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकरावी ठरावधारक संस्था प्रतिनिधींना अग्रीम (टोकन) वाटण्यास सुरुवात केल्यावरून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी टीका केली आहे. याच मुद्द्यावरून गोकुळचे दुसरे सत्ताधारी नेते आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांचे हे विधान मोठा विनोद असण्याची प्रतिटीका केली आहे. तथापि, यातून गोकुळच्या सत्तेच्या नवनीतासाठी आतापासूनच संघर्ष सुरू झाल्याचे दिसू लागले आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. या संस्थेवर सत्तेची मांड ठोकणे म्हणजे मलई चाखण्याचे हुकमी राजकारण करण्यासारखे आहे. एक वेळ लोकसभा, विधानसभेचे उमेदवारी नको पण गोकुळचे संचालक पद हवेच असा आग्रह धरला जातो. त्यामुळे गोकुळचे नेतृत्व मिळवण्यासाठी टोकाची लढाई केली जाते.
गोकुळ दूध संघावर २५ वर्ष महादेवराव महाडिक यांचे नेतृत्व होते. त्याला गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे आदींना सोबत घेऊन शह दिला. तेव्हापासून गोकुळवर सतेज पाटील – हसन मुश्रीफ या मित्रांचे सत्तापर्व सुरू झाले.
केंद्र – राज्याप्रमाणेच गोकुळ मध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे असे गोकुळ मधील विरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांनी पटवून दिल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे फर्मान काढले. परिणामी सतेज पाटील यांच्या समर्थकांना ऐनवेळी खो मिळाला आणि हसन मुस्लिम यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली. यामुळे विरोधी गटाचा विशेषतः महाडिक कुटुंबीयांचा विश्वास वाढला आहे. गोकुळची निवडणुकीची महायुतीच्या माध्यमातून झाली पाहिजे असे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
गोकुळच्या नेतृत्वाने संस्था प्रतिनिधींच्या ठरावधारक सभासदांना गाठून मर्जी राखण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यासाठी अग्रीम रक्कम (ऍडव्हान्स ) पोहचवला जात आहे. लाख मोलाची ही भेट सभासदांना ठरावधारक सभासदांना भुरळ घालत आहे. या अर्थपूर्ण घडामोडी गोकुळच्या निवडणुकीचा निकाल बदलवू शकतो. याची जाणीव झाल्याने विरोधी गोटातून बोचरे भाष्य केले जात आहे. महादेवराव महाडिक यांनी यांच्याकडून अग्रीम वाटपावर टीका केली आहे. गोकुळवर २५ वर्षे राज्य सत्ता गाजवली. परंतु असा प्रकार कधी केला नाही, याची आठवण त्यांनी मुश्रीफ यांना करून दिली.
मुश्रीफ यांनी ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवावी यासाठी दिल्लीपर्यंत यंत्रणा कार्यरत झाली आहे. या घडामोडीची दखल घेत आता मुश्रीफ यांनी गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढणार असल्याचे म्हणत महाडिक यांच्या आरोपाला शह दिला आहे. मुश्रीफ महायुती बरोबर लढतील असे दिसू लागल्याने गोकुळ मध्ये आपल्याला एकट्यालाच लढावे लागणार आहे याची जाणीव झालेले सतेज पाटील यांनी एकलव्य रणनीती आखली आहे. मी एकाकी आहे मला साथ द्या, अशी भावनिक मांडणी त्यांनी चालवली आहे. गोकुळ मधील अग्रीम घटकावर टीका करणारे महादेवराव महाडिक यांच्याकडून होणारी टीका म्हणजे सर्वात मोठा विनोद अशा शब्दात आमदार पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात अर्थपूर्ण राजकारण महाडिक यांनी सुरू केले, असा टोला त्यांनी लगावला. पण त्यातून गोकुळचा सत्ताबाजार काही लपून राहिला नाही.
बऱ्याच दिवसानंतर सतेज पाटील – महादेवराव महाडिक हे एकमेकांना भिडताना दिसत आहेत. या माध्यमातून गोकुळच्या निवडणुकीचे अर्थपूर्ण घडामोडी कशा पद्धतीने सुरू आहेत हे वर्षभर आधीच पाहायला मिळत आहे. गोकुळच्या सत्तेचा गोळा मटकावण्यासाठी बड्या नेत्यांच्या लाखामोलाच्या चाली सामान्यांना अचंबित करणाऱ्या आहेत.