नंदुरबार : राज्यातील पालकमंत्र्यांच्या नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना त्यांचा हक्काचा नंदुरबार जिल्हा सोडून भंडाऱ्याचे पालकमंत्री करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील अनिल पाटील यांच्यावर नंदुरबारच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अचानक झालेल्या या बदलाने डॉ. गावित यांचे हे पक्षांतर्गत झालेले खच्चीकरण की राज्यात सत्तेत असलेल्या तीन पक्षांमधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडी याला कारणीभूत ठरली, याबाबत चर्चा रंगली आहे. अनिल पाटील यांना पालकमंत्री देत एकाच दगडात तीन पक्षी मारण्याचा राजकीय डाव साधला गेला असला तरी यामुळे डॉ. गावित समर्थकांमध्ये नाराजी तर, स्वपक्षीय विरोधकांसह इतर पक्षांमधील विरोधकांमध्ये आनंदाची लाट उठली आहे.
तब्बल २७ वर्षाच्या कार्यकाळानंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांना स्वत:चा जिल्हा असलेल्या नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. साडेसात वर्षांपासून मंत्रिपदापासून दूर राहिलेल्या गावित यांना आदिवासी विकासमंत्रिपद आणि शिवाय नंदुरबारचे पालकमंत्रिपद मिळाल्याने दुग्धशर्करा योगच जुळून आला होता. अशातच त्यांची एक मुलगी खासदार डॉ. हिना गावित यांच्या माध्यमातून केंद्रीय प्रतिनिधीत्व तर दुसरी मुलगी डॉ. सुप्रिया गावित जिल्हा परिषद अध्यक्षा असल्याने जिल्ह्यातील सर्व सत्तेचे केंद्रबिंदू डॉक्टर गावित यांच्या घरात एकवटले होते. त्यामुळे जिल्ह्यात गावित कुटुंबियांचा एकहाती दबदबा निर्माण झाला होता. १९९६ मध्ये तत्कालीन युती शासनाच्या काळात दोन वर्षे पालकमंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबारचे पालकमंत्रिपद आणि त्यातही जिल्ह्यात विकास गंगा आणण्याच्या अनुषंगाने सर्व महत्वाची पदे हातात असल्याने त्यांनी जिल्ह्यात विकास कामांना वेग दिला होता.
हेही वाचा : कल्याण – डोंबिवलीकडे ठाकरेंची पाठ
गावित यांच्यावर राजकीय विरोधक मात्र कमालीचे नाराज होते. भाजप अंतर्गत त्यांच्या विरोधातील नाराजी लपून राहिलेली नाही. जिल्ह्यातील इतर मतदारसंघात ते विकासासाठी पैसे देत नसल्याचा आरोप स्वपक्षीयांकडून झाला असतांना राज्यातील सत्तेतील भागीदार असलेला शिंदे गट आणि गावित यांच्यातील राजकीय वैर हे सर्वांनाच माहीत आहे. सत्तांतरानंतर या दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांशी जुळवून घेण्याऐवजी एकमेकांची कुरघोडी करण्यातच धन्यता मानल्याने जिल्ह्यातील अनेक समित्यांच्या नियुक्त्याही रखडल्या होत्या. अशातच सत्तेत झालेला राष्ट्रवादीचा प्रवेश आणि त्यांनाही विश्वासात न घेता कारभार एकहाती हाकण्याचा गावित यांचा हातखंडा स्वभाव जिल्ह्यातील तीनही पक्षातील राजकीय नाराजी आणि कुरघोडीला खतपाणी घालणारा ठरला.
हेही वाचा : ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई
यातूनच पालकमंत्री बदलात नंदुरबारचे पालकमंत्रिपद काढून गावित यांना दूरवरचे भंडाऱ्याचे पालकमंत्री करण्यात आले. पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेल्या जळगावच्या अनिल पाटील यांना जवळच्या नंदुरबारचे पालकमंत्री करण्यात आले. पाटील यांना पालकमंत्री केल्याचा सर्वाधिक आनंद हा शिंदे गटाला होणे साहजिक आहे. कारण शिंदे गटाचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा चंद्रकांत रघुवंशी आणि पाटील यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. आपल्या विजयात रघुवंशी यांचा सिंहाचा वाटा, असे सांगणारे पाटील पालकमंत्री झाल्याने शिंदे गट सर्वाधिक आनंदी असणार. पाटील आल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीलाही बळ मिळणार आहे. दुसरीकडे, पाटलांचे कट्टर विरोधक असलेल्या माजी आमदार शिरीष चौधरी यांना देखील ही चपराक म्हणावी लागेल. नंदुरबार पालिकेतील भाजप गटाचे मार्गदर्शक शिरीष चौधरी हेच आहेत. रघुवंशीविरुध्द दोन हात करतांना गावित यांच्या माध्यमातून त्यांना बळ मिळत होते. आता पालकमंत्री बदलला गेल्याने चौधरी यांना अमळनेरपाठोपाठ आता नंदुरबारमध्ये कडवी राजकीय झुंज द्यावी लागणार आहे. गावित यांच्याकडून पालकमंत्रिपद काढून घेण्यास असे अनेक कंगोरे आहेत.