मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे काढत महायुती सरकारविरोधात रणशिंग फुंकणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य भाजप आणि शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत अजूनही फिरकले नसल्याने येथील ठाकरे निष्ठावंतांच्या गोटात अस्वस्थतेचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा असून भाजपच्या काही नेत्यांसोबत असलेले मतभेद मिटविण्याकडे शिंदे पिता-पुत्रांचा अलिकडे कल दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे पुत्राला आव्हान देईल असा चेहरा कोण आणि त्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघात कराव्या लागणाऱ्या तयारीचे काय अशी संभ्रमावस्था सध्या ठाकरे गटात आहे.
कल्याण डोंबिवली ही शहरे नेहमीच ठाकरे कुटुंबियांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ कल्याणमध्ये वास्तव्य होते. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी या डोंबिवलीच्या माहेरवाशीण. या नात्यामधून ठाकरे घराण्याशी निष्ठा असलेल्या शिवसैनिकांची एक मोठी फळी या शहरांमध्ये उभी राहील्याचे इतिहास सांगतो. कल्याणनंतर शिवसेनाप्रमुख मुंबईत कायमस्वरुपी निवासासाठी स्थलांतरित झाले तरी त्यांचे कल्याण, डोंबिवली शहरांवर सतत लक्ष असायचे. गटार गंगा झालेल्या काळा तलावाचे सौंदर्यीकरण करुन घेण्यातही बाळासाहेबांचा मोठा पुढाकार राहीला. याच काळात डोंबिवलीतील नागरिकांना मनोरंजन, करमणुकीचे साधन म्हणून बालभवनची उभारणी त्यांनी करुन घेतली. शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातील डोंबिवली जवळील कचोरे गाव हद्दीतील तारांगण प्रकल्प मात्र शिवसेना पालिका पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा नमुना ठरला. तरीही शहरातील अनेक सुविधांचे प्रकल्प हे बाळासाहेबांच्या आग्रहाने सुरु झाले.
हेही वाचा : ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई
बंडानंतर ठाकरेंची पाठ
डोंबिवलीतील नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी माहेरवाशीण रश्मी ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियमित सूचना करत असत. डोंबिवली पश्चिमेतील भाषाप्रभू पु. भा. भावे यांच्या नावाची वास्तू सुशोभित करुन तेथे साहित्यिक, नागरिकांसाठी चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना यापूर्वी रश्मी यांनी केल्या होत्या. ठाकरे कुटुंबीयांचे या शहरांवरील प्रेम, वास्तव्य यामुळे या भागातील नागरिक नेहमीच शिवसेनेशी घट्ट नाते ठेऊन राहीले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मात्र शिवसेनेत उभी फुट पडली असून ठाकरे कुटुंबियांनी देखील शहराकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. बंडानंतरही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची एक मोठी फळी अजूनही ठाकरे यांच्यासोबत आहे. असे असताना फुटीनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरेच काय आदित्यही या शहरांमध्ये फिरकलेले नाहीत. राज्याच्या इतर भागात नियमित दौरे करणारे, शेताच्या बांधवरील चिखलात फिरणारे ठाकरे पिता-पुत्र ठाण्यात नियमीत येतात. मात्र कल्याण, डोंबिवलीकडे फिरकत नसल्याने ठाकरे निष्ठावतांमध्ये कमालिची अस्वस्थता आहे.
हेही वाचा : “कांशीराम एका पक्षाचे नाहीत”, दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून ‘बसपा’पेक्षा जोरदार प्रयत्न
उमेदवारीची अनिश्चितता
भाजप-शिंदे गट शिवसेनेकडून कल्याण, डोंबिवलीतील आगामी लोकसभा, विधानसभा उमेदवार, निवडणुकीची पायाभरणी सुरू आहे. असे असताना ठाकरे गटात मात्र शुकशुकाट आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची याची साधी चर्चाही अजून ठाकरे गटात नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळेल यासाठी कोणतेही प्रयत्न मातोश्रीवरुन होत नसल्याची उघड चर्चा आता स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आमच्या नियमित बैठका होतात. आम्हाला मार्गदर्शन केले जाते. चौक सभांच्या माध्यमातून केंद्र, राज्य सरकार कडून होणाऱ्या फसव्या घोषणांची माहिती लोकांना दिली जात आहे. आम्ही ठोस कार्यक्रम दिला नसल्याने वरिष्ठ नेते आले नाहीत”, असे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी म्हटले आहे.