अकोला : वाशीम जिल्ह्याचे पालकत्व थेट ६३० कि.मी.वरील कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे प्रतिनिधित्व करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे. मोठ्या जिल्ह्याची अपेक्षा असतांना वाशीम सारखा लहान व अप्रगत जिल्ह्याची जबाबदारी मुश्रीफ यांना मिळाली. त्यामुळे नाराज झालेले हसन मुश्रीफ आकांक्षित वाशीम जिल्ह्याला न्याय देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे वाशीमचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या कोट्यात गेले.

वाशीम हा शासन दरबारी नेहमीच दुर्लक्षित राहिलेला जिल्हा. या जिल्ह्यातील प्रश्न, समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. विकासात्मक दृष्ट्या मागासलेल्या या जिल्ह्यात मंत्रिपदाचाही सातत्याने दुष्काळच राहिला. वाशीमचा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश आहे. सिंचन, रस्ते बांधणी, औद्योगिक विकास, शाळा, आरोग्य सुविधा आदी विकासात्मक कामे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. राज्य शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये ताळमेळ साधून जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.

आणखी वाचा-Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग; राहुल गांधींनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट, काँग्रेस- आरजेडीच्या आघाडीला बळ मिळणार?

वाशीमला बहुतांश वेळा बाहेर जिल्ह्यातीलच पालकमंत्री लाभले. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील शंभूराज देसाई यांच्याकडे वाशीमचे पालकत्व होते. पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक महिने ते जिल्ह्यात येतच नसल्याने त्यांच्यावर टीका देखील झाली. त्यानंतर महायुती सरकारच्या काळामध्ये संजय राठोड यांच्याकडे वाशीमची जबाबदारी होती. आता पुन्हा पालकमंत्री पदासाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा असतांना त्यांना शिवसेना पक्षातूनच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला, तर काही पदाधिकारी समर्थनार्थ समोर आले होते. मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यात तीव्र मतभेद आहेत. पालकमंत्री पदावरून वाशीममध्ये शिवसेनेतच दोन मतप्रवाह होते. अखेर शिवसेनेकडील वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या कोट्यात गेले.आता वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली.

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कागल ते वाशीम हे भौगोलिक अंतर सुमारे ६३० कि.मी. आहे. एवढ्या लांबवरचे अंतर पार करून हसन मुश्रीफ वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी निष्ठेने निभवतील की केवळ स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला झेंडा फडकवण्याचीच औपचारिकता पार पाडतील? हा खरा कळीचा मुद्दा ठरेल. वाशीम जिल्ह्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्र्यांवर आली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते असल्याने वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील विविध विकास कामे व प्रश्न मार्गी लागण्याच्या वाशीमकरांच्या अपेक्षा त्यांच्याकडून राहणार आहेत.

आणखी वाचा-गिरीश महाजन यांच्यासाठी कुंभमेळा आला धावून

‘हवे होते कोल्हापूर मिळाले वाशीम’

कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असलेल्या हसन मुश्रीफ यांची वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर बोळवण करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ते कोल्हापूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे आता देखील ते कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेने दावा केल्याने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना जबाबदारी मिळाली. त्यामुळे मुश्रीफ नाराज असल्याचे बोलल्या जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीमचे पालकमंत्री पद मिळाले, ठिक आहे. पण आता उपाय नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. -हसन मुश्रीफ, पालकमंत्री, वाशीम.