गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला होता. सध्या गुजरातमध्ये भाजपाचे सरकार आहे. मात्र भाजपाचे सरकार असले तरी हार्दिक पटेल स्वत:च्याच पक्ष आणि सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पहिलाच प्रश्न स्वपक्षाच्याच सरकारला विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची सत्त कायम? मेघालयमध्ये एनपीपी आघाडीवर

सरकार जुन्या शाळा जपण्याचे औदार्य दाखवणार का?

गुजरातमध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात हार्दिक पटेल यांनी गुजरात सरकारच्या राज्यातील शाळांबाबतच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केला. “राज्यात काही शाळा ७५ ते १०० वर्षे जुन्या आहेत. या शाळांना ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र या शांळाची सध्याची स्थिती फार दयनीय आहे. आर्थिकदृष्ट्या या शाळा डबघाईला आल्या असून सरकार त्यांना जपण्याचे औदार्य दाखवणार का?” असा प्रश्न पटेल यांनी विचारला आहे.

हेही वाचा >>> लागोपाठ तीन विजयांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला

याआधीही सरकारच्या धोरणावर ठेवले बोट

पटेल यांनी आमदार म्हणून विधिमंडळात हा पहिलाच प्रश्न विचारला आहे. पटेल भाजपाच्या तिकिटावर आमदार झालेले आहेत. असे असले तरी त्यांनी स्वत:च्या सरकारला हा प्रश्न विचारला आहे. विशेष म्हणजे या प्रश्नानंतर विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांनी हार्दिक पटेल यांचे कौतुक केले आहे. हार्दिक पटेल यांनी याआधीही सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले होते.

कृषीमंत्र्यांना लिहिले होते पत्र

पटेल यांनी २० फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या कापूस खरेदी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी कृषीमंत्री राघवजी पटेल यांना याबाबत एक पत्रदेखील लिहिले होते. गुजरात राज्यात काही भागांमध्ये स्थानिक कापसाच्या वाणाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेसाठीच्या निकषांमध्ये बदल करावा, अशी विनंती हार्दिक पटेल यांनी केली होती. हार्दिक पटेल यांच्याप्रमाणेच वडोदरा जिल्ह्यातील सावली येथील आमदार केतन इनामदार आणि सुरत जिल्ह्यातील वाराच्छा येथील आमदार किशोर कनानी हे दोघे स्वत:चा पक्ष, म्हणजेच भाजपाच्या नीतीविषयी प्रश्चचिन्ह उपस्थित करत असतात.

हेही वाचा >>> विजय शिवसेनेचा अन वादाची घुसळण कोल्हापूर काँग्रेसच्या दोन गटात

गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता

दरम्यान, भाजपाने गुजरातमध्ये एकहाती सत्ता मिळवलेली आहे. एकूण १८२ जागांपैकी भाजपाने तब्बल १५६ जागांवर विजय मिळवलेला आहे. येथे भाजपाचे पूर्ण बहुमतातील सरकार आहे. काँग्रेसला येथे फक्त १७ जागांवर विजय मिळवता आलेला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat budget session 2023 bjp mla hardik patel raise questions own government prd
First published on: 02-03-2023 at 18:51 IST