मागील २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. याच कारणामुळे यावेळच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या १ डिसेंबर रोजी येथे विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, काँग्रेस तसेच आप पक्षाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केले आहेत. गुजरातमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या तीनही पक्षांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यात आप पक्ष अग्रस्थानी राहिला आहे. प्रचाराच्या काळात आप पक्षाचे ट्विटर आणि फेसबुक खाते वेळोवेळी अपडेट होत राहिले. दिल्लीमध्ये पालिका निवडणुकीसाठी प्रचार केला जात आहे. असे असले तरी आम आदमी पार्टीने (आप) गुजरातकडे लक्ष दिल्याचे समोर आले आहे. आम आदमी पक्षाच्या फेसबुक आणि ट्विटर खात्याद्वारे गुजरात निवडणुकीसंदर्भात माहिती शेअर करण्यात येत होती.

आपच्या गुजरात प्रदेशच्या ट्विटर खात्याला एकूण १३८ हजार लोकांनी फॉलो केलेले आहे. या खात्यावर आप पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या सभांचे वेळापत्रक रोज जाहीर करण्यात येत होते.

भाजपा आपच्या मागे

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी थोडी मागे राहिली आहे. भाजपाच्या ट्विटर आणि फेसबुक खात्यावरून २१ ते २७ नोव्हेंबरच्या काळात अनुक्रमे एकूण ४० आणि ३५ टक्के पोस्ट या गुजरात निवडणुकीशी निगडित होत्या. भाजपाच्या ट्विटर खात्यावर १९.५ दसलक्ष तर फेसबुक खात्यावर १६ दसलक्ष फॉलोवर्स आहेत.

भाजपाच्या गुजरात प्रदेशच्या ट्विटर हँडलला एकूण १.५ दसलक्ष लोक फॉलो करतात. या ट्विटर हँडलवर मागील ३० वर्षांत गुजरात राज्य कसे होते आणि भाजपाची सत्ता आल्यानंतर काय विकास झाला, हे दाखवण्यात आले. त्यासाठी रॅप, गाण्यांचाही उपयोग करण्यात आला. भाजपाने आपल्या प्रचारादरम्यान मोदींच्या प्रतिमेचा वापर केल्याचे दिसते.

काँग्रेसच्या ट्विटर, फेसबुकवर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या ट्विटर आणि फेसबुक खात्यावर खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडे यात्रेविषयी अधिक माहिती देण्यात येत होती. याकाळात फक्त १५ टक्के ट्विट्स हे गुजरात निवडणुकीशी निगडित होते. २१ ते २७ नोव्हेंबर या काळात काँग्रेसच्या ट्विटर खात्यावरून एकूण २८० ट्विट्स करण्यात आले. यातील फक्त ४२ ट्विट्स हे गुजरात विधानसभा निवडणुकीशी निगडित होते. तर फेसबुकवर फक्त २२ टक्के पोस्ट्स या गुजरात निवडणुकीशी निगडित होत्या.