कोल्हापूर : वरिष्ठ पातळीवरून चौकशी यंत्रणांचा दबाव तर स्थानिक राजकारणात आरोपांची मालिका या परिस्थितीची कोंडी फोडून त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते हसन मुश्रीफ यांनी दंड थोपटले आहेत. अजित पवार यांचा दौरा आणि शिवजयंती सोहळा यानिमित्त मुश्रीफ यांनी जंगी शक्ती प्रदर्शन करीत विरोधकांना शह देण्याची तयारी चालवली आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या आसपास दबावापुढे न झुकता संघर्ष करण्याची मुश्रीफ यांची मानसिकता दिसत आहे.

भाजपाने केंद्रात व राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी काही मतदारसंघ आणि विरोधकातील काहींना लक्ष्य केले आहे. या यादीत आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव आघाडीवर असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येते. भाजपाला जशास तसे प्रत्युत्तर देण्यात मुश्रीफ नेहमीच आक्रमक राहिले. ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली होती. परिणामी भाजपाने मुश्रीफ यांना घेरण्याची रणनीती आखली.

हेही वाचा – विदर्भात एकेकाळचे कट्टर विरोधक एकाच मंचावर ; सत्तांतरानंतर वैर संपले?

तपास यंत्रणेशी संघर्ष

किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर सातत्याने आर्थिक घोटाळ्याचे आरोप मालिका चालवली. याचाच परिणाम काय म्हणून पुढे प्राप्तिकर, ईडी या तपास यंत्रणांनी मुश्रीफ आणि कुटुंबियांची चौकशीचे सत्र सुरू केले. ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेतही ईडीने छापेमारी केली. “आपले कसलेही आर्थिक गैरव्यवहार नाहीत. याचे आरोप सिद्ध झाले तर आमदारकीचा राजीनामा देवू”, अशी तयारी मुश्रीफ यांनी जाहीरपणे मांडली आहे. चौकशी प्रश्नी मुश्रीफ यांची आक्रमक भूमिका असताना दुसरीकडे कागल येथे त्यांच्या समर्थकांनी तर जिल्हा बँकेसमोर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली. ईडीसह तपास यंत्रणेशी संघर्ष करण्याची या सर्वांचीच भूमिका दिसते आहे.

शक्ती प्रदर्शनाची तयारी

आता याचे पुढचे पाऊल मुश्रीफ आपल्या कागल बालेकिल्ल्यात लढण्याच्या तयारीला लागले आहेत. विरोधी माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कागल येथे गुरुवारी विकासकामांचा लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्त मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे ईडीने चौकशीचा प्रयत्न केला तेव्हा पवार यांनी थेट ईडी कार्यालय गाठून चौकशी यंत्रणेला बधणार नसल्याचे दाखवून दिले होते. आताही अजित पवार यांच्या कागल दौऱ्यातून मुश्रीफ यांनी चौकशी यंत्रणेला अशाच धैर्याने सामोरे जावे, असा संदेश दिला जाण्याचा कयास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – गर्दीमुळे मुख्यमंत्री तर, कामांच्या मंजुरीने आमदार कांदे सुखावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भगवे वादळ

कागल मतदारसंघात मुश्रीफ यांना रोखण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना ताकद पुरवली आहे. घाटगे यांनीही विकासकामे असो की राजकीय मुद्दा, मुश्रीफ यांच्यावर टीकेच्या फैरी सुरू केल्या आहेत. लढाऊ बाण्यानुसार मुश्रीफ यांनीही घाटगे यांच्यावर प्रहार चालवले असल्याने कागलचे समर आतापासूनच तापले आहे. कागल मतदारसंघात मुश्रीफ यांना कोंडीत पकडायचे तर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणणे लाभदायक असल्याचे भाजपचे धोरण आहे. रविवारी शिवजयंती निमित्त कागल, गडहिंग्लज, आजरा या मतदारसंघातील तालुक्यातील लोकांना एकत्रित आणून आपल्यामागे असणारी राजकीय ताकद दाखवण्यासाठी मुश्रीफ सक्रिय झाले आहेत. शिवजयंती दणक्यात साजरी करून भगवे वादळ आणण्याचा इरादा व्यक्त करत भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला प्रतिशह देण्याची चाल मुश्रीफ यांनी चालवली आहे. कागलमध्ये राम मंदिर, शिवाजी महाराज पुतळा याची उभारणी करणाऱ्या मुश्रीफ यांनी मतदारसंघात शंभराहून अधिक मंदिरांची उभारणी करून श्रावणबाळप्रमाणे मंदिरवाले बाबा अशी प्रतिमा जाणीवपूर्वक जोपासून भाजपाच्या हिंदूंच्या भूमिकेला छेद द्यायला सुरुवात केली असल्याने सामना रंगात आला आहे.