कोल्हापूर : उमेदवारी मिळणार की नाही याचे मभळ दूर होऊ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. इकडे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचा गुंता सुटताना दिसत नाही. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर निकालाचा रागरंगही ठरणार आहे. तोवर शिवसेनेची उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी सत्यजित पाटील यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे, मराठा क्रांती सेनेचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी ‘मातोश्री’ची पायधूळ झाडायला सुरुवात केली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात मुख्य लढत असणार आहे. तथापि मविआचा पाठिंबा कोणाला याची उकल अद्याप झालेली नाही. त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. मविआने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला आहे. मविआने शेट्टी यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा नको आहे. कारण या पक्षाचे साखर सम्राट प्रचाराच्या मंचावर आली की त्याचा फटका बसतो याचा शेट्टी यांना गत निवडणुकीत कटू अनुभव आला आहे. त्यामुळे शेट्टी यांना केवळ शिवसेनेचा पाठिंबा हवा आहे.
हेही वाचा : पुणे जिल्ह्यात भाजपची कोंडी
उद्धव ठाकरे व राजू शेट्टी यांच्या दोन वेळा चर्चा झाल्या असल्या तरी अद्यापही निर्णय झालेला नाही. शेट्टी यांच्याशी जुळणार नसेल तर ठाकरे यांनी मशाल चिन्हावर उमेदवार उभा करण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यापैकी एकाची निवड करण्याचे घाटत आहे. शिवसेनेच्या मतांचा मोठा गट्टा या मतदारसंघात असून तो निर्णायक ठरणारा आहे.
भाजप मित्रपक्ष गमावणार ?
शिवसेनेच्या उमेदवारीचे महत्व लक्षात घेऊन पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि सध्या भाजपशी जवळीक असलेल्या नेत्यांनी मातोश्रीवर संपर्क साधायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये भाजपला पाठिंबा दिलेले माजी मंत्री, ताराराणी आघाडीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कल्लाप्पांना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे ऊस समितीचे अध्यक्ष राहुल आवाडे तसेच मेट्रो हायटेक टेक्सटाईल पार्कचे संस्थापक, उद्योजक सुरेश पाटील यांनीही मशालीच्या उजेडाने मतदारसंघ उजळून काढण्याची तयारी केली आहे. सन २०१४ सालच्या निवडणुक सुरेश पाटील यांनी मराठा क्रांती पक्षाच्या माध्यमातून लढवले होती. हा पक्ष आता भाजपचा मित्रपक्ष आहे. कल्लाप्पांना आवाडे यांच्या तीन लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आवाडे घराण्याच्या पाठीशी आहे. त्यात त्यांनी दोन वेळा विजय मिळवलेला होता. मतदारसंघात भक्कम जाळे असल्याचा दावा करीत आवाडे व पाटील या दोघांनीही आपल्या उमेदवारीचे महत्त्व उद्धव ठाकरे यांना पटवून देण्याचे ठरवले आहे. दोघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळली तर भाजपाला एक मित्रपक्ष गमवावा लागणार आहे. तथापि, मातोश्रीचा कौल कोणाच्या बाजूने कौल असणार यावर माने – शेट्टी यांच्यासह ठाकरे सेनेच्या उमेदवाराचे भवितव्यही अवलंबून असणार आहे.
हेही वाचा : रायगडामध्ये तटकरेंच्या कोंडीसाठी ‘बारामती पॅटर्न’
हातकणंगले मतदारसंघात यंदा जैन उमेदवारांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तिसऱ्यांदा लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. राहुल आवाडे यांनीही रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील हे बहुजन वंचित आघाडीचा झेंडा घेऊन आखाड्यात उतरणार आहेत. या मतदारसंघात जैन समाजाचे मते निकाल बदलवणारी असली तरी मतविभाजन होण्याचा धोका समाजाच्या उमेदवारालाच बसणार हे स्पष्टपणे दिसत असून त्याचा नेमका परिणाम कोणावर होणार हे निकालातून स्पष्ट होईल.