बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे. नितीश कुमार यांनी विरोधी पक्षातून सत्ताधारी एनडीएमध्ये प्रवेश केल्याने या लोकसभा निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. बिहारमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आपली बाजू लढवीत आहेत. अशा परिस्थितीत एनडीएमधील एकमेव मुस्लीम विद्यमान खासदार चौधरी मेहबूब अली कैसर यांनी लोक जनशक्ती पार्टीला (राम विलास) राम राम करीत राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केला आहे. ते २०१४ पासून खागरिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, पक्षाकडून या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजदमध्ये प्रवेश केला. देशात वाढत असलेला धार्मिक द्वेष आणि मोदींची घटती लोकप्रियता अशा अनेक विषयांवर त्यांनी आपली मते मांडली आहेत.

एनडीएची साथ सोडण्यामागे तिकीट नाकारणे हेच एकमेव कारण आहे का?

तिकीट नाकारले जाणे हे नक्कीच एक निमित्त आहे. मी एनडीएमध्ये असूनही गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये मला मुस्लिमांकडून खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील एनडीएचा एकमेव मुस्लीम चेहरा म्हणूनदेखील मला प्रसिद्धी मिळाली. खागरियामधून एनडीएकडून पुन्हा एकदा निवडून येण्याचा आत्मविश्वास मला होता. इतकेच काय, खागरियामधील जामा मशिदीच्या इमामांनी जरी एनडीएच्या तिकिटावर निवडणूक लढवली तरी मी आता जिंकू शकेन, असा आत्मविश्वास मला आहे. मात्र, मी आता राजदमध्ये प्रवेश केला असून, इंडिया आघाडीचा भाग झालो आहे. भाजपाच्या सत्ताकाळात संविधान आणि लोकशाहीला असलेला धोका अशा मोठ्या प्रश्नांवर मला भूमिका घ्यायची आहे.

हेही वाचा : भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?

याआधी मोदींना पाठिंबा असताना आता टीका कशी करू शकाल?

पंतप्रधान मोदींचा करिष्मा आणि लोकप्रियता यांमुळे मी त्यांचा समर्थक होतो. मात्र, आता त्यांची लोकप्रियता रसातळाला चालली आहे. त्यांच्या सत्ताकाळात हिंदू-मुस्लिमांमधील तेढ वाढत आहे. मी स्वत:चंच कौतुक सांगत नाही; पण मला काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे. खागरियामधील माझा विजय हा इतर कोणत्याही घटकांपेक्षा मी घेतलेले कष्ट आणि माझा कौटुंबिक वारसा यांमुळे झाला होता. माझे वडील चौधरी सलाहुद्दीन हे सिमरी बख्तियारपूरमधून आठ वेळा आमदार राहिलेले होते. ते बिहारचे माजी मंत्रीही होते. सिमरी बख्तियारपूर हे आधीचे राजघराणे होते. माझे आजोबा त्या राजघराण्याचे नवाब होते. २०१० मध्ये बिहार काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होण्याआधी मीदेखील आमदार आणि मंत्री राहिलो आहे.

इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील?

या निवडणुकीचे निकाल भल्याभल्यांना आश्चर्यचकित करतील, असे विधान विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केले होते. मी त्या विधानाशी सहमत आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत बरीच चर्चा झाली. आधी असे वाटले होते की, हा मुद्दा निवडणुकीत फार प्रभावी ठरेल. मात्र, तो आता हवेत विरून गेला आहे. पंतप्रधान मोदींना आपल्या प्रचारसभांमधून लोकांना त्या मुद्द्याची आठवण करून द्यावी लागते. पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. त्यामध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. निवडणुकीबाबत लोकांचा उत्साह कमी झाला असल्याचे यातून दिसून येते. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून मुस्लिमांविषयी केलेले वक्तव्य अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे हिंदू-मुस्लिमांमधील धार्मिक तेढ वाढीस लागू शकते.

विरोधक या निवडणुकीला एक मजबूत पर्याय म्हणून सामोरे जात आहेत का?

इंडिया आघाडीने अधिकाधिक प्रचारसभा एकत्र घेण्यावर भर दिला पाहिजे. राजद, समाजवादी पार्टी काँग्रेस वैयक्तिकरीत्याही चांगल्या प्रचारसभा घेत आहेत. राजदचे नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांनी एनडीएला तगडे आव्हान दिले आहे.

हेही वाचा : “काँग्रेस देशाची संपत्ती मुस्लिमांना देईल”, मोदींचा आरोप; जाहीरनामा काय सांगतो?

तुम्ही काँग्रेसचे नेते होता, नंतर लोजपा आणि आता राजदमध्ये गेला आहात; याबद्दल काय सांगाल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी यापूर्वी कधीही राजदचा सदस्य नव्हतो. मात्र, काँग्रेसकडून आमदार असताना मी राबडीदेवींच्या सरकारमधील मंत्री होतो. त्यामुळे मी लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर दीर्घकाळ राजकारणात राहिलो आहे. माझा मुलगा युसूफ सलाहुद्दीन हा राजदकडूनच आमदार होता. चिराग पासवान यांनी मला खागरियामधून उमेदवारी का दिली नाही, याचे कारण मला माहीत नाही. पण, आता तो माझा भूतकाळ आहे. इंडिया आघाडीला खागरियामधून विजयी करणे हेच आता माझे ध्येय आहे.