हैदराबाद येथील पोलीस चकमकीत झालेला चार आरोपींचा मृत्यू तेलंगणा सरकारच्या अडचणी वाढवू शकतो. २०१९ मध्ये हैदरबादमधील एका महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर बलात्काराची घटना घडली होती.  या बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. या चकमकीत सामील असलेल्या १० पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत ही शिरपूरकर आयोगाची शिफारस तेलंगणा सरकारच्या अडचणी वाढवू शकते.

२७ नोव्हेंबर २०१९ रोजी हैदराबादपासून जवळ असलेल्या शादनगर येथील चट्टपल्ली येथे एका महिला पशु वैद्यकीय अधिकाऱ्यावर सामूहिक बलात्कराची घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणात पकडण्यात आलेल्या ४ चार आरोपींचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती व्ही.एस शिरपूरकर आयोगाची स्थापना केली होती. या आयोगात ३ सदस्यांचा समावेश होता. न्यायमुर्ती शिरपूरकर यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रेखा सोंदूर बलदोटा आणि सीबीआयचे माजी संचालक डी.आर कार्तिकेयन यांचा समावेश होता. 

या शिरपूरकर आयोगाने त्यांचा चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात १० पोलिसांवर खोट्या चकमकीचा आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

शिरपूरकर आयोगाचा अहवाल आणि प्रकरण तेलंगणा उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने जर आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या तर त्यांच्यावर कारवाई करायची की नाही हा निर्णय तेलंगणा सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो. कारण बलात्कार प्रकरणातील आरोपींना चकमकीत ठार मारले या घटनेला त्यावेळी तिथल्या लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला होता. लोकांच्या भावना खूप तीव्र होत्या. अश्यावेळी आता त्या पोलिसांवर कारवाई केली तर ते जनमताच्या विरोधात जाण्याची भीती आहे. अशी प्रतिक्रिया येथील एका मंत्र्याने दिली आहे. 

६ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ आरोपींना हैदराबादपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चट्ट्पल्ली येथे नेण्यात आले. याच ठिकाणी कथित बलात्कार आणि खून झाला होता. पोलिसांनी संगितले की लोक गोळा होऊ नयेत म्हणून आम्ही त्यांना पहाटे तिथे घेऊन गेलो. यावेळी आरोपींनी पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात चार आरोपींचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चार आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांची शस्त्रे हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला यावर विश्वास बसत नसल्याची टिपणी आयोगाने केली आहे.