मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या राज्यातील चार महानगरांमधील कमी मतदानाच्या टक्केवारीची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून, या चारही महानगरपालिकांच्या आयुक्तांना नवी दिल्लीत आज पाचारण करण्यात आले आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत कोणते उपाय योजता येतील यावर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

राज्यातील शहरी भागांमध्ये मतदान कमीच होते. मुंबई, ठाण्यात उच्चभ्रू वस्तीतील लोक मतदानाला बाहेर पडण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यातच मे महिन्यात मतदान असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मतदार गावाकडे कूच करतात. मुंबईत ५० टक्क्यांपेक्षा कमीच मतदान होते. मुंबईतील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत ३० ते ३५ टक्के मतदान झाल्याची उदाहरणे आहेत. मुंबईत सरासरी ४० ते ४५ टक्के मतदान होते. नागपूर आणि पुण्यातही मतदारांमध्ये निरुत्साह जाणवतो.

हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज, शुक्रवारी ११ राज्यांमधील कमी मतदान होणाऱ्या मतदारसंघांमधील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पाटणा, हैदराबाद, अहमदाबाद, पाटणा, लखनौ, कानपूर यासह राज्यातील नागपूर, पुणे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्तांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यासह काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सरासरी ६७ टक्के मतदानापेक्षा कमी मतदान झाले होते. या ११ राज्यांमधील ५० मतदारसंघांमध्ये फारच कमी मतदान झाल्याचे निदर्शनास आले होते. यापैकी १७ मतदारसंध हे महानगरांमधील आहेत. महानगरांमध्ये होणारे कमी मतदान ही निवडणूक आयोगासाठी चिंतेची बाब असते. म्हणूनच निवडणूक आयोगाने देशातील महानगरांच्या आयुक्तांची बैठक बोलावून मतदानाचा टक्का कसा वाढविता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

मुंबई, ठाण्यात आधीच मतदारांमध्ये निरुत्साह असतो. झोपडपट्टी भागांमध्ये मतदानासाठी रांगा लागतात. पण उच्चभ्रू किंवा मध्यमवर्गीय परिसरातील मतदान केंद्रे दुपारनंतर ओस पडलेली असतात. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक प्रयत्न झाले, पण शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह कमी होत नाही. मुंबई, ठाण्यात मे महिन्यात मतदान आहे. सुट्टीच्या काळात मुंबई, ठाण्यातील मतदार हे बाहेरगावी किंवा गावाला जातात. याचा मतदानावर परिणाम होतो. बाहेरगावी जाणाऱ्या मतदारांना रोखता येत नाही. तरीही मतदान करून गावाला जा, असे आवाहन राजकीय पक्षांकडून केले जाते. मुंबई, ठाण्यात पहिल्या टप्प्यात मतदान झाले असते तर तेवढा फरक जाणवला नसता. पण मे महिन्याच्या मध्यास मतदान असल्याने मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेरगावी गेलेले असतील, असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.