भगवान मंडलिक

कल्याण डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक, त्यानंतरची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा भविष्यकालीन विचार करून कल्याण, डोंबिवली परिसरातील आपली पक्षीय बलस्थाने कायम ठेऊन निवडणुका लढविण्याचा निर्णय शिंदे गट, भाजप आणि मनसेच्या वरिष्ठांनी घेतला आहे. या त्रिपक्षी गुळपीठावरून येत्या काळात या भागात निष्ठावान शिवसेना गट विरुध्द शिंदे गट अशाच अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. 

मागील काही वर्षांपसून आणि गेल्या अडीच वर्षांपसून एकमेकांना पाण्यात पाहणारे, समोरा समोर आले तरी नजरेला नजर न देणारे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद पाटील आणि खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यात समेट झाल्याने खासगीत या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पूर्वाश्रमीचे आम्ही शिवसैनिकच होतो. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत गेलो, असे कार्यकर्ते खासगीत सांगतात. 

कल्याण डोंबिवलीतील मनसेचे पुसलेले अस्तित्व पुन्हा ठळक करण्याची  संधी या समेटातून मनसेला मिळाली आहे. येत्या पालिका निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि मनसेतून ही आखणी केली जाण्याची शक्यता आहे. खा. डाॅ. शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक ‘सुरक्षित’ करणे हीच या त्रिसूत्रीची खरी गणिते आहेत, असे राजकीय जाणकार सांगतात. शिंदे गटातील नाराज माजी आ. सुभाष भोईर यांना कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला. भोईर हे शीळ गावचे स्थानिक आहेत. कल्याण ग्रामीण भागात त्यांचे वर्चस्व आहे. कळवा, मुंब्रा, १४ गाव, २७ गाव भागात भोईर यांचा मतदार आहे. ते शिंदे गटाला निवडणूक काळात मतदानाच्या माध्यमातून हानी पोहचवू शकतात. कोणत्याही परिस्थितीत कल्याण ग्रामीण मधील शिवसेनेचा प्रत्येक मतदार हा शिंदे गटात सामील झाला पाहिजे यासाठी शिंदे गटाला मनसेचीही ग्रामीण भागात मदत लागणार आहे. आता झालेला समेट हा त्यासाठी  खूप महत्त्वाचा आहे, असे जाणकार सांगतात. 

मनसेने लोकसभेला शिवसेनाला मदत केली तर त्याची भरपाई विधानसभेला शिवसेनेकडून मनसेला केली जाईल. आपली आपली बलस्थाने कायम ठेऊन सुभाष भोईर व शिवसेनेला  या माध्यमातून शह देण्याची खेळी शिंदे गटाकडून खेळली जात असल्याचे कळते. ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाची अधिकाधिक कोंडी करण्याचे प्रयत्न पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून सुरू आहेत. त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागातील एकही शिवसैनिक आपल्या गटातून निसटणार नाही अशी व्यूहरचना शिंदे गटाने आखण्यास सुरूवात केली आहे. 

डोंबिवलीत कमळाचा आधार 

कल्याण लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण ग्रामीण भागात शिंदे गटाला मनसेची मदत मोलाची, तेवढ्याच तोलामोलाची मदत डोंबिवली शहरात शिंदे गटाला भाजपची लागणार आहे. डोंबिवलीतील संघाचा मतदार हा महत्त्वपूर्ण घटक आहे. भाजप सोडून तो कुठे जात नाही. महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या सहभागामुळे संघ, भाजपमध्ये तीव्र नाराजी होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्याने आणि त्यात नेते संजय राऊत यांच्या दररोजच्या बडबडीने डोंबिवलीतील मतदार तीव्र नाराज होता. हा सगळा फटका येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला बसणार होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडात भाजपमधील ज्या घटकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यात  डोंबिवलीतील भाजपचे आ. रवींद्र चव्हाण यांचाही सक्रिय सहभाग होता. चव्हाण, शिंदे गटात ३७१ कोटींच्या रस्ते निधी देण्यावरून कितीही धुसफूस असली तरी पडद्यामागून एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचे चांगले सख्य होते, हे आता लपून राहिलेले नाही. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्या साहाय्याने भाजप, संघाच्या मतदाराला आपलेसे करून नेहमीप्रमाणे या भागातून ८० ते ९० हजाराचे मताधिक्य घ्यायचे असा शिंदे गटाचा मनसुबा आहे. यातून या भागातील आपले वर्चस्व पुन्हा अबाधित ठेवण्याची शिंदे गटाची खेळी आहे. कोणत्याही परिस्थितीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला कल्याण, डोंबिवली पट्ट्यात वरचढ होऊ द्यायचे नाही. या एकमेव इराद्याने भाजप, शिंदे गट आणि मनसेचा समेट झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.