सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सद्यस्थितीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने मनसेचा मतदार वर्ग हा संभ्रमावस्थेत पडला आहे. पक्षाचा उमेदवार नसल्याने ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशा अवस्थेत असलेल्या मनसेच्या पारंपरिक मतदारांवर काँग्रेस आणि भाजपचा डोळा आहे. मात्र, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्षाध्यक्षाच्या आदेशाकडे डोळे लावून बसले आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचा पारंपरिक मतदार आहे. मागील तीन निवडणुकांद्वारे हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पूर्वाश्रमीचे मनसेचे नगरसेवक आहेत. २००९ मध्ये त्यांनी कसबा विधानसभा निवडणूक मनसेकडून लढविली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन आमदार गिरीश बापट यांना टक्कर दिली होती. तेव्हा बापट यांना ५४ हजार ९८२ मते पडली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर धंगेकर होते. त्यांना ४६ हजार ८२० मते मिळाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रोहित टिळक हे तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. धंगेकर यांना अवघ्या ८१६२ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यावरुन मनसेचा मतदार या मतदारसंघात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये धंगेकर यांचा वैयक्तिक संपर्क याचादेखील मोठा वाटा होता.

हेही वाचा… महापालिका निवडणूक लांबल्‍याने इच्‍छुकांमध्‍ये अस्‍वस्‍थता

त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही मनसेने छाप पाडली होती. मनसेकडून धंगेकर यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी बापट निवडून आले. मात्र, धंगेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची २५ हजार ९९८ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे रोहित टिळक हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र, धंगेकर यांच्यामुळे मतांची विभागणी झाल्याने बापट यांचा विजय सुकर झाला होता.

हेही वाचा… शिवसेनेच्या पूर्वीच्या प्रभावक्षेत्रात आदित्य ठाकरे यांनी साधला संवाद

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धंगेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे तत्कालीन मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली होती. तरीही शिंदे यांनी ८२८४ मते घेतली.

हेही वाचा… वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांचे स्थान अधिक पक्के

मागील तिन्ही निवडणुकांमध्ये मनसे समर्थक मतदार या मतदारसंघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यावेळी अद्याप कोणतेही आदेश आले नसल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संभ्रावस्थेत पडले आहेत. याबाबत मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, ‘कसबा मतदारसंघाबाबत आम्ही पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाची वाट पहात आहोत. पक्षाच्या आदेशानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.’

हेही वाचा… बाळासाहेब थोरात यांना पक्षाचे बळ

मनसेची भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनाबरोबर वाढती जवळीक पाहता मनसेकडून भाजपला साथ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, धंगेकर हे मूळचे मनसेचे असल्याने कोणता अंतर्गत संदेश दिला जाणार, यावर मनसेची पारंपरिक मते ही कोणाच्या बाजूने पडणार हे स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kasba peth by election confusion among mns over which candidate to support print politics news asj
First published on: 13-02-2023 at 16:18 IST