कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत. महायुतीने मेळावा घेऊन एकजुटीचे प्रदर्शन घडवताना निवडणूक ताकतीने लढण्याचा निर्धार केला आहे. महाविकास आघाडीच्या व्यापक बैठकीतही निवडणूक सांघीक प्रयत्नातून जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे ठरले. दोघांनाही निवडणूक जिंकायची असली तर उमेदवाराचा शोध हे समान आव्हान असणार आहे.
कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात झेंडा रोवण्यासाठी सत्ताधारी महायुतीने कंबर कसली असताना महाविकास आघाडीनेही एका मंचावर येत ताकदीचे दर्शन घडवले आहे. जिल्हास्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने महायुतीने प्रथमच शक्ती प्रदर्शन घडवले. यानिमित्ताने दुभंगलेली नेत्यांची मने एकत्र आली. गेल्या वेळचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि त्यांच्याशी सामना केलेले भाजपचे खासदार संजय धनंजय महाडिक हे एका मंचावर आल्याचे दिसले. तालुका पातळीवरील परस्पर विरोधात दंड थोपटणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ – भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे – माजी आमदार सुरेश हाळवणकर, राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील – अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे हातात हात घालून उभे ठाकणे हि महायुतीची जमेची बाजू ठरली.
हेही वाचा : काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन
भाजपच्या दाव्याने पेच
याचवेळीउमेदवार कोण याबाबत अजून संशयाचे गडद धुके दाटले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही जागा शिंदेसेनेकडे जाणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. पण अजूनही भाजप जिल्ह्यातील एक मतदारसंघ पक्षाला मिळाला पाहिजे या मागणीवर ठाम आहे. राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. समरजित घाटगे यांचेही नाव पक्ष पातळीवर चर्चेत आहे. हातकणंगले मध्येही माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, त्यांचे पुत्र राहुल आवाडे, शिवसेनेचे पूर्वीचे उमेदवार संजय पाटील ही नावे पुढे येत आहेत. भाजपकच्या कुजबूज आघाडीचा मतप्रवाह पाहता दोन्ही खासदार अजूनही निवडणुकीच्या बाबतीत निश्चित झाले असे ठोसपणे म्हणता येत नसल्याने खासदारांच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता दिसून येते. ठाकरे सेने ते शिंदे सेना असा प्रवास केलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, के.पी. पाटील यांनी व्यक्त केलेली खंत पाहता महायुती मध्ये सारे काही आलबेल नसल्याचा संदेश गेला.
हेही वाचा : उमेदवारीपेक्षा राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्या भूमिका महत्त्वाच्या, रामदास आठवलेही इच्छूक
महाविकास आघाडी कटिबद्ध
ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यात पुन्हा एकदा खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर या सेनेकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर ठाकरी शैलीत जोरदार टीका करून या गद्दारांना निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन केले. या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे सेनेमध्ये चैतन्य निर्माण झाले. हि संधी घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नाने महाविकास आघाडीचे तमाम नेते एकत्र गुंफले गेले. या बैठकीस आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, ( लोकसभेसाठी इच्छुक असलेले ) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे भाकपचे उदय नारकर, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, शेकापचे बाबुराव कदम, ब्लॅक पॅंथरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी एकत्र येत लोकसभेसाठी कटिबद्ध असल्याचा निर्वाळा दिला.
अद्यापही महाविकास आघाडीकडे लोकसभेसाठी दोन्ही पैकी एकाही ठिकाणी उमेदवार नक्की झालेला नाही. कोल्हापूर मध्ये आश्चर्यकारक चेहरा असेल असे सतेज पाटील यांनी म्हटले होते. पाठोपाठ माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मागील निवडणुकीची सल विसरलो नाही असे म्हणत पुन्हा निवडणूक लढवण्याचा व्यक्त केलेला निर्धार बरेच काही सांगणारा आहे. संभाजीराजेंना सेनेचा विरोध दिसतो. ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याची चर्चाही अडचणीची ठरू शकते. इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन राजू शेट्टी यांच्यावर टीकेची तोफ डागली असताना मविआ कडून राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न असल्याचे सतेज पाटील ठामपणे सांगताना दिसत आहेत. त्यामुळे मविआ अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपकडून राजू शेट्टी यांना विचारणा करण्यात आली असताना त्यांनी त्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शेट्टी हे अपक्ष लढणार की महाविकास आघाडीकडून याबाबतचा गोंधळ अजून कायम आहे. एकंदरीत महायुती असो की महाविकास आघाडी उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहणार हे नक्की.