मुंबई : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात (‘माकप’) लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून मोठी धुसफूस आहे. पक्षाची ताकद दिंडोरी मतदारसंघात असताना जिथे पक्षाचे संघटन नाही, अशा मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघात पक्षाने उमेदवार दिल्याने पक्षातील आदिवासी कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे.

सोलापूर, पालघर आणि दिंडोरी अशा तीन मतदारसंघाची ‘माकप’ने आघडीकडे मागणी केली होती. मात्र, आघाडीने घटक पक्षांना एकही जागा सोडलेली नाही. असे असले तरी पक्षाच्या ‘पॉलीट ब्युरो’ समितीने राज्यात किमान एका जागेवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला आहे. ‘नाशीक ते मुंबई’ असे देशाचे लक्ष वेधून घेणारे दोन ‘ शेतकरी लाँगमार्च’ ‘माकप’ने काढले आहेत. याचा लाभ या निवडणुकीत होण्याची शक्यता होती. त्यानुसार येथून पक्षाचे सात वेळा आमदार राहिलेले कॉ. जे.पी. गावीत यांनी तयारी केली होती.

हेही वाचा… कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?

पक्षाच्या राज्य सचिव मंडळाची बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. भाजपकडून उमेदवारी मागितलेल्या शांतीगिरी महाराज यांची कॉ. गावित यांनी भेट घेतल्याबद्दल या बेठकीत नापसंती व्यक्त करण्यात आली. याच बैठकीत दिंडोरी ऐवजी हिंगोली लढवण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे ‘माकप’मधील शेतकरी नेते आणि आदिवासी कार्यकर्ते यांच्यातील दुही उघड झाली आहे.

यासंदर्भात राज्य राज्य सचिव मंडळाचे अध्यक्ष काॅ. उदय नारकर म्हणाले, दिंडोरीत आमची ताकद आहे. मात्र आमच्या बंडखोरीने भाजपचा उमेदवार विजयी होईल. म्हणून आम्ही हिंगोलीची निवड केली. यासंदर्भात दिंडोरीतील इच्छुक उमेदवार काॅ. जे. पी. गावित म्हणाले, मी दिंडोरीतून लढण्याची तयारी केली होती. मात्र पक्षाच्या केंद्रीय समितीने वेगळा निर्णय घेतल्याने माझा नाईलाज झाला.

हेही वाचा… रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?

‘माकप’चे संघटन पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात आहे. डहाणूमध्ये पक्षाचा आमदार सुद्धा आहे. दिंडोरी हा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव मतदारसंघ आहे. असे असताना ‘पॉलीट ब्युरो’ने ढवळाढवळ करत मराठवाड्यातील हिंगोलीत विजय गाभणे यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पक्षातील या काटशहामागे आदिवासी नेते कॉ. जे. पी. गावित यांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न असल्याचे पक्षातील नेते-कार्यकर्ते नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात.