नागपूर : परभणी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना“ काँग्रेस फोडा आणि पक्ष खाली करा” असा कानमंत्र दिला, त्याची चर्चाही राज्यभर झाली. त्यांचे म्हणने भाजप कार्यकर्त्यांनी किती मनावर घेतले हे लवकरच स्पष्ट होईल. पण ,भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाने मात्र, बावनकुळेंचा सल्ला लगेच मनावर घेतला आणि त्यावर त्यांच्याच जिल्ह्यात त्याच दिवशी अमलही केला.
सोमवारी नागपुरातील रविभवनात झालेल्या शिंदे गटाच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात फक्त काँग्रेसच नव्हे तर राष्ट्रवादी,भाजप, उध्वव ठाकरे यांची शिवसेना, बसपासह अन्य पक्षाच्या दहा माजी नगरसेवकांना प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्ष प्रवेश नागपुरातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
शिवसेना एकसंघ होती तेंव्हा आणि आता दुभंगली असताना पक्षाची ताकद नागपुरात भाजपने कधीच वाढू दिली नाही. एकसंघ शिवसेनेची भाजपसोबत युती होती तेव्हाही महापालिका किंवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचाच वरचष्मा राहात आला. आता सेना दुभंगली. शिंदेचा गट भाजपसोबत सत्तेत असल्याने व या गटाचा एक मंत्री नागपूर जिल्ह्यातील असल्याने त्यांनीही पक्षविस्तारावर भर दिला आहे. तोही भाजपच्या गढ असलेल्या नागपुरात.
दरम्यान भाजपने यापूर्वीपासूनच जि.प. महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून काँग्रेसच्या माजी जि.प. सदस्यांना पक्षात प्रवेश देणे सुरू केले आहे , शहरात त्यांच्या गळाला अजून मोठा मासा लागला नाही, पण त्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहे.. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडा आणि पक्ष खाली करा असा जो कानमंत्र दिला होता.त्याकडे याच अनुषंगाने बघितले जाते. ज्या दिवशी वरील आवाहन केले. त्याच दिवशी नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यात काँग्रेससह अन्य पक्षातील १० नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे यात भाजप नेते ,माजी खासदार दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक व माजी महापौौर रघुनाथ मालीकर यांचाही समावेश आहे. मालीकर यांचा शिंदे गटातील प्रवेश भाजपसाठी धक्कादायक मानला जातो.
भाजपला पर्याय देण्याचा प्रयत्न
पक्षात वाढलेली बेदीली आणि प्रदीर्घ काळापासून सत्तेपासून दूरअसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुसरीकडे सत्तेत असलेला भाजप हीच बाबओळखून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपशिवाय दुसरा कुठलाही पर्याय विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेत्यांकडे नाही, अशी अहम भावनाही या पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य विरोधी पक्षातील माजी नगरसेवक आता भाजप ऐवजी शिवसेना शिंदे गटाचा विचार करू लागले आहे. एकाच वेळी विविध पक्षाचे दहा नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणे याकडे याच अनुषंगाने बघितले जात आहे.
काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची टीका
बावनकुळे यांच्या काँग्रेस फोडा याविधानाला काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. स्वतःचे घर बांधायचे असेल तर कष्टाने वाळू सिमेंट विकत घ्या दुसऱ्याच्या घरून चोरून आणू नका, असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. कोणी म्हणल्यामुळे काँग्रेस खाली होत नाही काँग्रेस हा विचार आहे, काँग्रेस हा एक मानवतेचा धर्म आहे. येथील किती जातील येतील पण काँग्रेस संपू शकत नाही, काँग्रेस खाली होऊ शकत नाही. ही मानसिकता लोकशाहीसाठी आणि राजकीय ते साठी प्रगल्भपणाचे लक्षण नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.