अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : राज्यात सत्ताबदल झाला असला तरी न्यायालयात विविध याचिकांवर सुनावणी होणे बाकी असल्याने शिंदे गट-भाजप सरकारचे भवितव्य अद्याप अधांतरी आहे. त्यामुळेच आगामी महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक ध्यानात घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. सध्या कुंपणावर बसलेल्या अनेकांना न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच पक्षांतराच्या घडामोडी होऊ शकतील.

हेही वाचा… प्रकाश आवाडेंच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचारिकता

शहरात भाजप-सेनेचे प्राबल्य आहे. शहरातील तीनही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. प्रशासक नियुक्त होण्याआधी महापालिकाही भाजपकडेच होती. भाजपने ६६ जागा जिंकल्या होत्या. शिवसेना ३५, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा, मनसे पाच, रिपाइंला एक आणि अपक्षांकडे तीन जागा होत्या. आगामी निवडणुकीत ४४ प्रभागात १३३ जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजपने सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मुक्तपणे प्रवेश दिला होता. त्यातील बहुतांश निवडून आले. यावेळी नव्याने आणखी कोणाला सामावणे भाजपलाही अडचणीचे आहे. राज्यातील सत्ता बदलामुळे पुन्हा काही जण भाजपमध्ये प्रवेशास नक्कीच इच्छुक आहेत. परंतु, ओबीसी आरक्षणावर स्थानिक राजकीय समीकरण ठरतात. त्यानुसार तसे निर्णय घेतले जातील. दुसरीकडे, मूळ शिवसेना कोणाची, याचा वाद न्यायालयात आहे. शिवसेनेचे पक्षचिन्ह कुणाला मिळेल, यावर सेनेतील बंडखोरी अवलंबून आहे. भाजप आणि शिंदे गटाची स्थानिक पातळीवर युती होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शिंदे गटातील काही भाजपमध्येही जाऊ शकतील. विद्यमान नगरसेवक वगळता भाजपही उर्वरित जागांवर तुल्यबळ उमेदवार देण्याच्या तयारीत राहील. पक्षाकडे तशा उमेदवाराची कमतरता भासल्यास अगदी, सेना, काँग्रेस वा राष्ट्रवादीतून ऐनवेळी येणाऱ्यांचाही विचार केला जाईल. पण, तशा जागा फारशा नाहीत. त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या इतकी आहे की, इतरांना प्रवेश दिल्यास पुन्हा नवे-जुन्यांच्या वादाला तोंड फुटू शकते.

हेही वाचा… जळगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सध्या तरी भाजपपासून दूर

जिल्ह्यात सटाणा आणि देवळा-चांदवड मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. पैकी देवळा-चांदवडमध्ये भाजपचे विविध संस्थांवर प्राबल्य असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीतून कोणीही भाजपमध्ये जाण्यास सध्यातरी उत्सुक नाही. सटाण्यात मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काही पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik those people eager join bjp waiting supreme court decision print politics news asj
First published on: 24-07-2022 at 15:56 IST