राजगोपाळ मयेकर

शिवसेनेच्या शिंदे गटाने दापोलीतील कार्यकर्ता मेळाव्यात शक्तीप्रदर्शन करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या सभेला ठाकरे गटापेक्षा जास्त गर्दी झाली होतीच, पण भाजप पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बसवून आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरही कदम पितापुत्रांनी शिक्कामोर्तब केले.

दोन दिवसांपूर्वी येथे झालेल्या सभेत ठाकरे गटाच्या नेत्यांनी हशा आणि टाळ्या मिळविणाऱ्या अश्लील भाषाशैलीचा पुरेपूर वापर केला होता. पण शिंदे गटाच्या नेत्यांनी ती शैली टाळत सभेत ‘बॅकफूट’ खेळीचा प्रत्यय दिला.

हेही वाचा… सभासद नोंदणीवरून राष्ट्रवादीच्या निरीक्षकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या

ठाकरे गटाच्या सभेच्या वेळी जास्त गर्दी झाल्याने दापोली दाभोळ रस्ता बंद करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली होती. या प्रकाराबाबत प्रतिष्ठित नागरिक प्रसाद फाटक यांनी संबंधितांवर रास्ता रोकोचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी शासनाकडे केली आहे. शिंदे गटाच्या सभेसाठी मात्र आयोजकांनी मैदानामध्ये व्यासपीठ उभारल्याने सर्व शिवसेना कार्यकर्ते मैदानातच बसले आणि रस्ता बंद करण्याची नामुष्की ओढवली नाही.

हेही वाचा…‘रामायण’ आणि ‘बुद्धिस्ट’ सर्किट प्रमाणेच ‘आंबेडकर सर्किट’वर विशेष पर्यटक रेल्वे धावणार : जी किशन रेड्डी

आमदार योगेश कदम यांनी आपल्या भाषणात भारतरत्नांच्या पावित्र्य विटाळणाऱ्या आणि वाहतुकीचा मुख्य रस्ता बंद करणाऱ्या विरोधकांचा जाहीर निषेध केला. मात्र ग्रामोफोन रेकाॅर्डप्रमाणे ठाकरे गटाच्या नेत्यांची सुई जशी ‘गद्दार, खोके, बोके’ शब्दांवरच अडकून राहिली, तशीच शिंदे गटाच्या नेत्यांची सुई ‘आम्हाला तोंड उघडायला लावू नका, आमचाच खरा बाळासाहेबांचा विचार ‘ या वाक्यांवरच अडकून राहिल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाची सभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पराभूत नेत्यांनीच प्रयत्न केले आणि गर्दी होण्यासाठी गुहागरमधून कार्यकर्त्यांच्या गाड्या मागविण्यात आल्या, असा गौप्यस्फोटही यावेळी करण्यात आला. सभेसाठी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, भरत गोगावले, अशोक पाटील आदींसह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा… काश्मीर संस्थानचा शासक राजा हरी सिंहची जयंती जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत भाजपबाबत पूर्वग्रह दर्शविणाऱ्या कदम पितापुत्रांनी या सभेसाठी मात्र भाजप नेते केदार साठे, भाऊ इदाते यांना व्यासपीठावर जागा देऊन आगामी निवडणुकांसाठी युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दापोलीत सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वाहत असून प्रत्येक इच्छूक उमेदवार पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर कदम पितापुत्रांकडून युतीला मिळालेला दुजोरा ठाकरे गटासह राष्ट्रवादीला नवे आव्हान ठरणार आहे‌.