रत्नागिरी : आचारसंहिता जाहीर होऊन सुमारे आठवडा झाला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली असून त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी आणि बैठका घ्यायला सुरुवातही केली आहे. महायुतीकडून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने सुमारे महिनाभरापूर्वीच इच्छा व्यक्त केली आहे . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं तरच निवडणूक लढवण्यास तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते याबाबत शेवटपर्यंत आग्रही राहिले तर शिंदे गटाला उमेदवारी मिळूनही विद्यमान खासदार राऊत यांना तोंड देऊ शकेल, अशा क्षमतेचा अन्य उमेदवार त्यांना मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

दुसरीकडे भाजपाचे स्थानिक पदाधिकारीही या जागेबाबत आग्रही असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपाचे या लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार हे नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत. त्याचबरोबर महायुतीकडून उमेदवाराचं नाव जाहीर होण्यास उशीर होत आहे तशी नवनवीन नावं चर्चेमध्ये पुढे येत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सध्या पक्ष संघटनेत केंद्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेले विनोद तावडे यांचाही त्यामध्ये समावेश आहे. आता सामंतांनी भाजपाचं चिन्ह स्वीकारावं म्हणून दबाव तंत्र आहे, की भाजपाचे राज्य आणि केंद्र पातळीवरचे नेते ही चाचपणी गंभीरपणे करत आहेत, याबाबत संदिग्धता आहे. एक मात्र खरं, सुमारे महिनाभरात भाजपाने ही भूमिका टप्प्याटप्प्याने जास्त तीव्र करत नेली आहे आणि त्याला पूरक म्हणून ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सोडायची, की भाजपाने लढवायची, की शिंदे यांच्या उमेदवाराने भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन लढवायची, याबाबतच निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींनी गुलदस्त्यात ठेवला आहे . त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली आहे.

हेही वाचा : “यंदा भिवंडी मतदारसंघ सोपा, उमेदवाराची गफलत करु नका”, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पवारांना साकडे

या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, उमेदवार भाजपाचा असो किंवा शिंदे सेनेचा, दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचं काम किती मनापासून करतील, याला या मतदारसंघात निश्चितपणे मर्यादा आहेत. भाजपाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार बाळ माने किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नारायण राणे व कुटुंबीय किरण सामंत उमेदवार असतील तर किती मनापासून बळ देतील, याबाबत शंका आहे. माने आणि पालकमंत्री सामंत यांचं तर गेल्या सुमारे पंधरा वर्षांचं राजकीय वैर आहे आणि नारायण राणेंचा मुख्य अजेंडा थोरले चिरंजीव नीलेश यांचं राजकीय पुनर्वसन करणं, हा आहे.‌ त्यामुळे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला आणि कोणी कितीही आणाभाका घेतल्या तरी या वितुष्टाचे पडसाद निवडणुकीच्या मतदानामध्ये पडणार आहेत.

हेही वाचा : बॉम्बस्फोटाप्रकरणी वादग्रस्त विधानावर कारवाई, कोण आहेत ‘या’ भाजपाच्या खासदार?

या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत असून ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे अजूनही तसा वेळ उपलब्ध आहे. पण कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येऊ नये म्हणून हा निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. त्यातच येत्या सोमवारपासून कोकणचा राष्ट्रीय उत्सव असलेला शिमगोत्सव सुरू होत आहे . राज्याच्या अन्य भागांप्रमाणे येथील उत्सवाचं स्वरूप केवळ दोन दिवसांपुरतं मर्यादित नसतं. विशेषतः शिमगा झाल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी घरोघरी नेण्याची प्रथा रत्नागिरी जिल्ह्यात असल्यामुळे गावाच्या आकारमानानुसार हा उत्सव काही ठिकाणी सुमारे दोन आठवडेसुद्धा चालू राहतो. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि राजकीय कार्यकर्त्यांचाही मूड वेगळा असतो. अशा परिस्थितीत येत्या दोन-तीन दिवसात याबाबत अंतिम निर्णय झाला तरी कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने कामाला लागण्यास एप्रिलचा पहिला आठवडा उजाडणार आहे. हे वाया जाणारे दिवस कोणत्याही उमेदवारासाठी चिंतेचा विषय होणार आहेत.

हेही वाचा : सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निर्णयाचं घोडं कुठे अडलं आहे, असा प्रश्न विचारला तर शिंदे गटाचे नेते भाजपा नेत्यांकडे बोट दाखवतात आणि भाजपाचे राज्य पातळीवरील नेते मोदी-शहा या जोडगोळीवर सगळा भार टाकतात. त्यांच्या मनात काय आहे, हे शेवटपर्यंत कळत नाही, अशी पुष्टीही ते जोडतात. त्यात भाजपा त्यांच्या वाट्याला असलेल्या आठ ते दहा जागांचासुद्धा पेच अजून सोडवू शकलेला नाही. त्यात काही ठिकाणी उघड बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचं मुख्य लक्ष आधी आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार ‘सुरक्षित’ करण्यावर आहे. शिवाय, अशा तऱ्हेने इच्छुकांची भाऊ गर्दी असली किंवा बंडखोरी झाली असली तर कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते ‘ठंडा करके खाओ’ हे धोरण अवलंबतात. तेच इथेही दिसून येत आहे. पण त्यामुळे उमेदवारांचे कार्यकर्ते थंड पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.