जयेश सामंत

ठाणे जिल्ह्यात भाजपचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी आघाडी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा विचार पुढे आल्यानंतर मंगळवारी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, शिवसेना आणि विशेषत: पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात नवी मुंबईतील ३६३ कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाच्या निमित्ताने ४०० झाडांची कत्तलीच्या नावाखाली वाद सुरू झाला असून शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी सुरू झाली आहे. याशिवाय शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना ठाणे व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आघाडी नकोच असल्याच्या चर्चेने ठाण्यातील आघाडीच्या चर्चेत बिघाडीचा मीठाचा खडा पडत आहे. महाविकास आघाडीतील ठाण्यातील शिंदे-आव्हाड या दोन वजनदार मंत्र्यांमधील बिघाडीचे ताजे निमित्त ठरले आहे ते नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या एका उड्डाणपूलासाठी होणाऱ्या ४०० झाडांच्या कत्तलीचे.

नवी मुंबईत गेल्या तीन दशकांपासून गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. १९९५ मध्ये नाईकांनी शिवसेनेच्या माध्यमातून येथील महापालिकेवर पहिल्यांदा भगवा फडकाविला. पुढे नाईकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले. त्यानंतर सलग चार वेळा या महापालिकेवर नाईकांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. साधारण आठ वर्षापूर्वी देशात आणि राज्यात नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही नाईकांनी येथे राष्ट्रवादीला सत्ता मिळवून दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात भाजप-शिवसेना युतीचेच सरकार येणार अशीच हवा असल्याने नाईकांनी मुलांच्या आग्रहापुढे मान तुकवत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे भाजपला आणि मंत्रीपदाची स्वप्न पाहणाऱ्या नाईकांनाही सत्तेपासून दूर राहावे लागले. मंत्रीपद तर मिळाले नाहीच शिवाय करोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने नवी मुंबईत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने येथील महापालिकेवरील नाईकांचा एकछत्री अंमलही मोडून पडला.

गणेश नाईकांमुळे एरवी नवी मुंबईत शिवसेनेची डाळ शिजायची नाही. प्रशासकीय राजवटीमुळे मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तीच पूर्व दिशा असा कारभार सध्या ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमध्ये सुरू आहे. नवी मुंबई महापालिकाही त्यास अपवाद नाही. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर हे नव्या दमाचे अधिकारी असले तरी पालकमंत्र्यांचा शब्द मोडणे सध्या तरी त्यांच्या आवाक्यात नाही. या एकछत्री अंमलामुळे महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिंदे-बांगर जोडीने वाशीत एका उड्डाणपूलाची आखणी केली. त्यासाठी ३६३ कोटी रुपयांचे कंत्राट एनसीसी नामक एका ठेकेदारास देऊ केले. ही कंपनी गेल्या काही वर्षात भलतीच तेजीत आली आहे. एमएमआरडीए, ठाणे महापालिका, एमएसआरडीसी यासारख्या शिंदे यांच्या अंमलाखाली असलेल्या शासकीय संस्थामधील काही मोठी कंत्राटे या कंपनीच्या पदरात पडली आहेत. त्यामुळे वाशीतील उड्डाणपूलाचे ३६३ कोटी रुपयांचे हे कंत्राट एनसीसी कंपनीला मिळताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत निविदांद्वारे योग्य रकमेची बोली लावत या कंपनीने हे काम मिळविल्याचा दावा अभियांत्रिकी विभागातील अधिकारी करत असले तरी उड्डाणपुलासाठी ४०० झाडांची कत्तल होत असल्याने नवी मुंबईत हे प्रकरण भलतेच तापले आहे.

पर्यावरण प्रेमी नागरिक, संस्था, लोकप्रतिनिधींनी या झाडांच्या कापणीस विरोध केला आहे. आठवडाभरापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत एकही झाड कापू दिले जाणार नाही अशी भूमिका घेतली. वरवर पहाता आव्हाडांची भूमीका पर्यावरणवाद्यांशी सुसंगत वाटत असली तरी झाडांच्या निमित्ताने आव्हाडांनी ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाहीला थेट आव्हान दिले. आव्हाडांचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे महापालिका हद्दीत आणि विशेषत: कळवा-मुंब्रा पट्टयातील विकासकामांमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढलेला हस्तक्षेप आव्हाडांच्या जिव्हारी लागला आहे. पालकमंत्री शिंदे समेटाची भूमिका घेतात मात्र त्यांचा खासदारपुत्र मिळेल तिथे आपल्याला आव्हान देतो हे आव्हाडांना रुचत नाही, असे बोलले जाते. शिवाय ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी करणार नाही अशीच खासदार शिंदे यांची भाषा आहे. त्यामुळे आव्हाड फारच दुखावले गेले आहेत. वाशीतील उड्डाणपूलाच्या कंत्राटाला झाडांचे निमित्त साधून विरोधाचे अस्त्र उपसत आव्हाडांनी शिंदे पिता-पुत्रांना खिंडीत गाठण्याची संधी साधली आहे. उड्डाणपुलाच्या कंत्राटात ठाणेकरांच्या वरदहस्ताच्या सुरस कथा नवी मुंबईत मोठ्या चवीने चर्चिल्या जात असताना आव्हाडांनी या झाडांच्या फांदीवरून नेमके कोणाला लक्ष्य केले याची चर्चा सुरू असून यात आघाडीच जखमी होण्याची शक्यता आहे.