सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले असताना, पुण्यात दोन्ही काँग्रेसपैकी नक्की ताकदवान कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक, तर काँग्रेसचे अवघे दहा, आमदारांची संख्या दोघांचीही प्रत्येकी एक, खासदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात दोन, राज्यसभेत एक, तर काँग्रेसचा एकही नाही…वरकरणी ही आकडेवारी राष्ट्रवादीच बलवान असल्याचा दाखला देते. मात्र, मागील लोकसभा, विधानसभा आणि महापालिका या तिन्ही निवडणुकांतील दोन्ही काँग्रेसच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास पुणे लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य असल्याचे स्पष्ट होते.

महापालिकेत काँग्रेसपेक्षा जास्त नगरसेवक असल्याचे दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेवर हक्क सांगण्यात सुरुवात केली आहे.  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्याची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळायला हवी, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हा निर्णय केंद्रीय पातळीवर चर्चा करून घेण्याचे जाहीर करत अजित पवार यांना नमते घेण्याचा सल्ला दिला. तरीही अजित पवार यांनी निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी देण्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याची जागा काँग्रेसची असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर २ जून रोजी  होणाऱ्या बैठकीत पुण्याच्या जागेबाबतचा तोडगा काढण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> राज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त, पोटनिवडणुका बंधनकारक आहेत का?

अजित पवार यांच्या भूमिकेमुळे पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असली, तरी आजवर झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या मतांची आकडेवारी पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसची ताकद ही पुणे लोकसभा मतदार संघात जास्त असल्याचे दिसून येते. या मतदार संघात कोथरुड, शिवाजीनगर, पर्वती, कसबा. पुणे कँन्टोन्मेट आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो.

हेही वाचा >>> जालना मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही, सात वेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव

लोकसभा निवडणुकांत काँग्रेस सरस

लोकसभेच्या १९९९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समोरासमोर लढले होते. त्यावेळी भाजपचे प्रदीप रावत हे विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत खासदार विठ्ठल तुपे राहिले होते. त्यानंतर दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यावर काँग्रेसनेच या मतदार संघातून निवडणूक लढविली आहे. २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी हे निवडणूक आले. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपचे अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये भाजपचे गिरीश बापट विजयी झाले होते. या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून अनुक्रमे विश्वजीत कदम आणि मोहन जोशी यांनी निवडणूक लढविली होती.

हेही वाचा >>> कोल्हापुरमध्ये राष्ट्रवादी थोरला की धाकटा भाऊ ?

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघांपैकी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे खासदार असून, पुणे लोकसभेचे नेतृत्त्व खासदार गिरीश बापट हे करत होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीवरून दोन्ही काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. सध्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण या खासदार आहेत. काँग्रेसचा जिल्ह्यात एकही खासदार नाही.

विधानसभा मतदार संघांमध्ये राष्ट्रवादी कमकूवत

या मतदार संघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांपैकी वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, तर कसब्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत. अन्य चारही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या चारपैकी दुसऱ्या क्रमांकाची मते ही पर्वती मतदार संघात राष्ट्रवादीला, तर अन्य दोन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळाली होती. पर्वतीत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम या दुसऱ्या स्थानावर होत्या. पुणे कँन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे, तर शिवाजीनगरमध्ये काँग्रेसचे दत्ता बहिरट हे दुसऱ्या क्रमांकावर होते. कोथरुड मतदार संघाची जागा दोन्ही काँग्रेसने मनसेसाठी सोडली होती.

टिंगरे यांना ९७ हजार ७०८, तर कदम यांना ६० हजार २४५ म्हणजे राष्ट्रवादीची मतदार संख्या एक लाख ५७ हजार ९५३ होती. धंगेकर यांना ७३ हजार ३०९, बागवे यांना ४७ हजार १४८ आणि बहिरट यांना ५३ हजार ६०३ मते म्हणजे काँग्रेसला एक लाख ७४ हजार ६० मते मिळाली होती. त्यावरून काँग्रेसची पारंपरिक मते ही राष्ट्रवादीपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद हडपसर आणि खडकवासला या विधानसभा मतदार संघांमध्ये आहे. मात्र, हे दोन्ही मतदार संघ पुणे लोकसभा मतदार संघात येत नाहीत. हडपसर मतदार संघ हा शिरुर लोकसभा मतदार संघात, तर खडकवासला मतदार संघ हा बारामती लोकसभा मतदार संघात येतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे कार्यक्षेत्र हे हडपसर मतदार संघात आहे.

राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक अन्य मतदार संघांतील

पुणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ नगरसेवक, तर काँग्रेसचे अवघे दहा नगरसेवक निवडून आले. काँग्रेसचे सर्व नगरसेवक हे पुणे लोकसभा मतदार संघाच्या हद्दीतून निवडून आले होते, तर राष्ट्रवादीचे अवघे १३ नगरसेवक या मतदार संघातील आहे. उर्वरित २९ नगरसेवक हे हडपसर आणि खडकवासला मतदार संघातील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक जास्त असले, तरी बहुतांश नगरसेवक हे अन्य मतदार संघांतील आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the statistics of votes congress is better than ncp in pune print politics news ysh
First published on: 30-05-2023 at 15:28 IST