पिंपरी : मित्र पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रबळ दाव्यानंतरही मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला सुटला आहे. शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खासदार बारणे तिसऱ्यावेळी निवडणुकीला सामोरे जात आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. पुणे जिल्ह्यातील महायुतीमधील मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. भाजपने कमळावर उमेदवार असावा अशी मागणी केली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळवर दावा केला होता. खासदार बारणे हे देखील कमळावर निवडणूक लढवतील अशी अनेक दिवस चर्चा होती. परंतु, या चर्चेवर पडदा टाकत त्यांनी आपले नाव शिवसेनेच्या यादीत असेल असे स्पष्ट केले होते. अखेरीस शिवसेनेची पहिला यादी जाहीर झाली. त्यात मावळमधून खासदार बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.
हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा
हेही वाचा – VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका
खासदार बारणे सलग तिसऱ्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी २०१४ मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर आणि मनसेच्या पाठिंब्याने लढलेले भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला होता. तर, २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केला होता. आता त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचे आव्हान असणार आहे.