– शिरीष पवार

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबद्दल असलेल्या उत्सुकतेचे प्रतिबिंब देशभरातील माध्यमांत उमटले आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीपुढे आव्हान उभ्या केलेल्या विरोधकांच्या या आघाडीचा चेहरा कोण असेल इथपासून तर प्रत्यक्षात ही आघाडी कितपत व्यवहार्य ठरेल, अशा प्रश्नांचा उहापोह प्रमुख प्रादेशिक, राष्ट्रीय वर्तमानपत्रे करीत आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात झालेली पहिली बैठक आणि नंतर काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकच्या राजधानी बंगळुरूमधील बैठकीनंतर इंडिया आघाडीचे पंख विस्तारत चालले आहेत. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय करिश्म्यावर भिस्त ठेवत विरोधकांची ही आघाडी मुंबईत आपली रणनिती धारदार करण्याचा प्रयत्न करील, असे मानले जाते. आज, जागरण डॉट कॉमने उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रासह शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील संपादकीयाचे वृत्त दिले आहे. भाजपने चंद्रयान वापरून प्रचार केला तरी, तो कमी पडेल, आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा उपयोग होणार नाही, भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपने तर हेलिकॉप्टर आणि इव्हीएम बुक करून मुदतपूर्व निवडणुकीची तयारी चालविली आहे, असा या लेखाचा गोषवारा जागरणच्या बातमीत दिला आहे.

हेही वाचा – मुंबईत ‘इंडिया’ची आज तिसरी बैठक, संयोजकपद कोणाकडे? जागावाटपावर चर्चा होणार का? जाणून घ्या…

दैनिक भास्करने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॉनर्जी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गॉस सिलिंडरच्या दरकपातीवरून केंद्रावर केलेल्या टीकात्मक विधानाचे शिर्षक करून बातमी दिली आहे. विरोधकांच्या आघाडीच्या दबावामुळे केंद्राने गॉस दरात कपात केली, आता आमच्या बैठका जसजशा होतील, तसे तसे आणखी कोणत्या वस्तूंचे भाव कमी होतील, ते पाहाच, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

प्रभात खबर या दैनिकाने लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव मुंबईत पोहोचल्याचे वृत्त ठळकपणे दिले आहे. शरद पवार बैठकीच्या तयारीत गुंतले असल्याचेही त्यात ठळकपणे नमूद केले आहे. मुंबईतील बैठकीत विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरणार काय, याचा उहापोहही अन्य एका बातमीत करण्यात आला आहे. लालूप्रसाद यांनी म्हटले आहे की, या वेळी पुन्हा मोदी येणार नाहीत. त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही जात आहोत. पण, विरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा नितीशकुमार यांचा मार्ग सोपा नाही, असेही त्यांनी मान्य केल्याचे, या वर्तमानपत्राने म्हटले आहे. तर, हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीत, नितीशकुमार हे स्वत:च ‘इंडिया’चे समन्वयक बनण्यास तयार नसून अन्य कोणावर ही जबाबदारी सोपवू इच्छितात, असे त्यांचे वक्तव्य छापून आले आहे.

हेही वाचा – ‘इंडिया’च्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार

‘दी हिंदू’मधील एका लेखाचे शिर्षक ‘इंडिया आघाडी आणि मतदारांना अनुकूल करून घेण्यातील अडथळा’ या अर्थाचे आहे. या आघाडीचे गणित कागदावर जुळवून आणल्यासारखे दिसत असले तरी विविध पक्षांतील ‘केमिस्ट्री’ म्हणजेच मेळ कसा साधायचा, असा प्रश्न त्यात अधोरेखित केला आहे.
विरोधकांचे एकजुटीचे प्रयत्न सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला भाकप, माकप आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीतीत प्रमुख पक्षांचे नेतेच अनुपस्थित होते. त्याबद्दल ममता यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीची केमिस्ट्री जुळवून आणणे हे किती कर्मकठीण आणि आव्हानात्मक आहे, याचा प्रचिती येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाता जाता… आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे नेते एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपशी युती करण्याची तयारी दाखवितानाच इंडिया आघाडीवर तोंडसुख घेतले आहे. या आघाडीला कोणताही नेता नाही, त्यामुळे तिला भवितव्य नाही. कर्नाटक आणि तेलंगण सोडले तर दक्षिण भारतात काँग्रेसचे अस्तित्व नाही, असा दावा त्यांनी केल्याचे वृत्त ‘दी हिंदू’त वाचायला मिळते.