राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या एका व्हिडीओमुळे सध्या बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. हा व्हिडीओ लालू प्रसाद यादव यांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक आरजेडी कार्यकर्ता लालू प्रसाद यादव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र भेट म्हणून देताना दिसत आहे आणि हे चित्र पायाजवळ धरण्यात आले आहे, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

नक्की काय घडलं?

  • एका व्हिडिओत आरजेडीप्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पायाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र धरण्यात आले आहे.
  • लालू प्रसाद छायाचित्रांसाठी पोज देताना दिसत आहेत.
  • या घटनेवर आरजेडीच्या विरोधी पक्षांनी, विशेषतः सत्ताधारी भाजपा आणि एनडीएच्या मित्रपक्षांनी तीव्र टीका केली आहे.
  • त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचा अपमान केल्याचा आणि दलितांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
एका व्हिडिओत आरजेडीप्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पायाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र धरण्यात आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

विरोधक आक्रमक

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सम्राट चौधरी यांनी या घटनेला डॉ. आंबेडकर आणि दलित समुदायाचा अपमान म्हटले आहे. तसेच हा बिहारच्या राजकीय इतिहासातील एक काळा अध्याय असल्याचे म्हटले आहे. लालू प्रसाद यादव यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. चौधरी म्हणाले, “लालूजींच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांचा असा अपमान झाला हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीसाठी यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट असू शकत नाही. ही घटना आरजेडीसाठी एका काळ्या अध्यायाचे प्रतीक आहे. त्यांनी नेहमीच दलित मतांचा वापर केला आहे. परंतु, यातून दलितांचा फारसा आदर नसल्याची मानसिकता दिसून येते.” त्यांनी आरोप केला की, आरजेडीने बिहारमधील मागास आणि दलित समुदायांचा सतत अपमान केला आहे.

केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनीही या घटनेचा निषेध केला आणि आरजेडी प्रमुखांवर अनादर केल्याचा आरोप केला. जीतन राम मांझी म्हणाले, “डॉ. आंबेडकरांचा फोटो पायाशी ठेवणे हे आपल्या देवाचा आणि सर्व दलितांचा मोठा अपमान आहे, परंतु याबाबत मला आश्चर्य वाटत नाही. जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की जर ते सर्वांचा अपमान करू शकतात तर ते बाबासाहेबांना का सोडतील? समाज सर्व काही पाहत आहे आणि समजून घेत आहे. मला विश्वास आहे की लालूप्रसाद यादव यांचा स्वतःचा समुदायदेखील हा अहंकार सहन करणार नाही,” असे मांझी म्हणाले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या घटनेला संविधानाचा अपमान म्हटले. “आंबेडकर आपल्या संविधानाचा आधारस्तंभ आहेत आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत. अशा वर्तनातून त्यांची मानसिकता दिसून येते,” असे ते म्हणाले. समस्तीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) खासदार शांभवी चौधरी यांनीही अशीच टीका केली. शांभवी चौधरी म्हणाल्या, आरजेडी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या दलित समुदायांची सतत दिशाभूल करत आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ते दलितांचा आणि त्यांच्या हक्कांचा अनादर करतात.”

त्या पुढे म्हणाल्या, “बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हक्कांसाठी लढा दिला आणि आम्हाला आवाज दिला. बिहारच्या लोकांना जाणीव व्हावी असा हा क्षण आहे. जर ते खरोखरच दलितांचा आदर करतात, तर ते आंबेडकरांचे चित्र त्यांच्या पायाशी कसे ठेवू देऊ शकतात? लालू यादव यांनी यावर प्रतिक्रियाही दिली नाही. आंबेडकरांचा फोटो त्यांच्या पायाशी असल्याचा त्यांना आनंद झाला,” असा आरोप त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरजेडीची प्रतिक्रिया

आरजेडीने एनडीए नेत्यांचे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगत फेटाळून लावले. आरजेडी प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू यादव यांची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि दलित मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हा व्हिडीओ जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे. ते म्हणाले, “हा भाजपाचा प्रचार आहे. त्यांच्याकडे कोणताही विषय नाही. भाजपा स्वतः बाबासाहेबांचा अनादर करण्यासाठी ओळखले जाते. लालू यादव यांनी कायम सामाजिक न्यायाचे समर्थन केले आहे आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल त्यांना सर्वोच्च आदर आहे,” असे ते म्हणाले.