ठाणे : राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा ठाणे जिल्ह्यातील केंद्रबिंदू ठरलेल्या भिवंडीतील लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षाचे या भागातील प्रमुख दयानंद चोरगे यांच्या नावाचा काँग्रेसच्या यादीत समावेश असल्याच्या वृत्ताने अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी सकाळी शरद पवारांची भेट घेत या उमेदवारीस विरोध केल्याचे वृत्त आहे. काँग्रेस पक्षाला ही जागा सोडायची असेलच तरी केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांच्यापुढे तुल्यबळ उमेदवाराचा शोध घ्यावा अशी मागणीही या नेत्यांनी पवारांकडे लावून धरल्याचे सांगण्यात येते.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील यांच्या माध्यमातून मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. पाच वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत पाटील यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजीचा सुर व्यक्त होत होता. त्यामुळे येथील निवडणुक चुरशीची होईल असा अंदाज होता. मात्र, बदलापूर, मुरबाड आणि भिवंडीच्या ग्रामीण भागातून पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले आणि जवळपास दीड लाखांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. पाटील यांच्या विजयात त्यावेळी मुरबाड-बदलापूरचे आमदार किसन कथोरे यांनी महत्वाची भूमीका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदाही त्या निवडणुकीत पाटील यांना मिळाला होता. त्यामुळे सुरुवातीला काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांचे वाटणारे आव्हान पुढे मात्र पाटील यांनी सहज मोडून काढले. यंदा मात्र या मतदारसंघात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : ठाण्यात आचारसंहितेचा भंग, मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न

कथोरेंची नाराजी, कुणबी मतदारही निर्णायक

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा मोठा पट्टा मुस्लिम बहुल मतदारांचा आहे. याशिवाय याठिकाणी आगरी-कुणबी मतदारांचाही भरणा आहे. या जातीय समिकरणांमुळे हा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात. गेल्या काही वर्षात हे समिकरण बदलले आहे. या मतदारसंघातून भाजपचे कपील पाटील विजयी झाले शिवाय भिवंडी पश्चिमेतून महेश चौघुले दोन वेळा कमळावर निवडून आले. मुरबाड-बदलापूरात किसन कथोरे भाजपचे आमदार आहेत तर भिवंडीच्या ग्रामीण भागावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेले शहापूरचे आमदार दौलत दरोडा हे सध्या अजित पवार यांच्या सोबत आहेत आणि कपील पाटील यांना त्यांच्या मदतीचा विश्वास आहे.

हेही वाचा : कल्याणमधील वालधुनी भागातील वाहन कोंडीने प्रवासी हैराण

योग्य उमदेवार द्या

असे असले तरी गेल्या काही ‌वर्षात आमदार किसन कथोरे आणि कपील पाटील यांच्या विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. कथोरे हे कुणबी समाजाचे असून मध्यंतरी खासदार पाटील यांनी त्यांच्यासंबंधी केलेल्या काही वक्तव्याचे कुणबी समाजातही पडसाद उमटले होते. भिवंडी पश्चिमेतील आमदार महेश चौघुले आणि खासदार पाटील यांचे संबध पुर्वीसारखे राहीले नसल्याचे बोलले जाते. भिवंडीच्या ग्रामीण भागातील मुळ शिवसेनेत खासदारांविषयी नाराजी आहे. अशा परिस्थितीत या मतदारसंघात योग्य उमेदवाराची निवड झाल्यास पाटील यांना घाम फुटू शकतो असे विरोधकांचे मत आहे. असे असताना दोन दिवसांपुर्वी काँग्रेसच्या पहिल्या यादी येथील पक्षाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांचे नाव पाहून अनेक जण आवाक झाले.

हेही वाचा : डोंबिवली : कंपनी मालकाने साथीदारांसह केली कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

काही वर्षांपुर्वी भाजपमध्ये असलेले चोरगे महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसमध्ये आले. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी भिवंडी पट्टयात आयोजनात महत्वाचे भूमीका बजावली होती. मध्यंतरी चोरगे ही जागा काँग्रेसला सुटावी यासाठी दिल्लीत जाऊन आले होते. असे असले तरी चोरगे हे संपूर्ण मतदारसंघात कपील पाटील यांना कितपत आव्हान देऊ शकतात याविषयी विरोधी गटातच संभ्रमाचे वातावरण आहे. चोरगे यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. कपील पाटील यांच्यासाठी मतदारसंघात अजिबात पोषक वातावरण नाही. परंतु उमेदवार चुकवून ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी करु नका असे आर्जव या नेत्यांनी पवार यांच्यापुढे केल्याचे सुत्रांनी सांगितले. या भेटीसंबंधी काँग्रेस अथवा राष्ट्रवादीतील एकही नेता उघडपणे बोलण्यास तयार नव्हता. दरम्यान भिवंडी मतदारसंघातील परिस्थीतीचा आढावा पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला, असे पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.