डोंबिवली : डोंबिवली जवळील टाटा पाॅवर पिसवली गावात राहत असलेल्या एका कर्मचाऱ्याला तळोजा येथील अपेक्स फ्रेस कंपनीचे मालक आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी मंगळवारी रात्री बेदम मारहाण केली. या मारहाणीत कर्मचाऱ्याच्या पाठीला जखमा झाल्या आहेत. या कर्मचाऱ्याने या मारहाण प्रकरणी कंपनी मालकासह चार जणांच्या विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. विकास कमलाशंकर दुबे (२७) असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो अपेक्स फ्रेस कंपनीत वितरक म्हणून काम करतो. कंपनी मालक परिक्षित सिंग राजपूत, त्यांचे सहकारी आसिफ खान, अमित चौहान, हितेंद्र सिंग आणि आसिफ अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, अपेक्स फ्रेस कंपनी मालकाने कर्मचारी विकास दुबे याचा एक महिना २० दिवसांचा पगार रोखून धरला आहे. या वेतनावर आपले कुटुंब चालते असे सांगुनही मालक वेतन देत नव्हता. हे वेतन लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन मालक परिक्षित राजपूत यांनी दुबे यांना दिले होते. दुबे यांनी एका आस्थापनेकडून कंपनीला मिळणारी देय रक्कम स्वत:च्या बँक खात्यावर घेऊन उरलेली सतरा हजार रुपये रक्कम संबंधितांना आपण सांगू तेव्हा द्या असे सूचविले होते. वेतनासाठी दुबे याने ही खेळी केली असल्याचा मालकाचा गैरसमज झाला होता.

हेही वाचा : टिटवाळ्याजवळ लोकलवर भिरकावलेल्या दगडीत दोन प्रवासी जखमी

मंगळवारी संध्याकाळी विकास दुबे आपली दुचाकी दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील पांडुरंगवाडीतील हंसो वाईन्स दुकानाच्या बाजुला असलेल्या कार्यशाळेत आला होता. तेथे आरोपी आसिफ खान, हितेंद्र आणि अमित चौहान आले. त्यांनी विकासला कंपनीचे देयक कधी अदा करणार असा प्रश्न केला. ते देयक उद्या भरणा करतो, असे सांगुनही आरोपींनी विकासचा मोबाईल हिसकावून घेऊन तो जमिनीवर आपटून फोडून टाकला. विकासला जबरदस्तीने रिजन्सी अनंतम सर्कल येथे आणून रिक्षेत बसवून त्याला शिळफाटा रस्त्याने तळोजा येथे अपेक्स फ्रेस कंपनीत रात्रीच्या वेळेत नेले.

हेही वाचा : घोडबंदर मार्गावर मदत मागूनही वाहन चालक थांबले नाहीत, अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू

तू कंपनीचे देयक का अदा करत नाहीस असे प्रश्न करत मालक परिक्षित यांच्यासह इतर आरोपींनी विकासला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. मालकाने विकासच्या नातेवाईकांना कंपनीत बोलावून घेतले. पैसे मिळण्याची हमी मिळाल्यानंतर विकासला सोडून देण्यात आले. आपले अपहरण करून आरोपींनी आपणास मारहाण केल्या बद्दल विकास दुबे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.