Jyotiraditya Scindia Comeback Shakes BJP मध्यप्रदेशच्या राजकारणात ग्वाल्हेरला खूप महत्त्व आहे. ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे सदस्य असल्यामुळे त्यांचे मध्य प्रदेशमध्ये वेगळे वजन आहे. कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्योतिरादित्य शिंदे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारण आहेत ग्वाल्हेरमधील पायाभूत सुविधा. सोमवारी ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांच्या आढावा बैठकीचे रूपांतर एका राजकीय नाट्यात झाले. शिंदे यांनी दीड वर्षानंतर या बैठकीला हजेरी लावली आणि ग्वाल्हेरचे राजकीय वातावरण क्षणात तापले. नेमके प्रकरण काय? भाजपामध्ये फुटीची चिन्हे का दिसू लागली? याविषयी जाणून घेऊयात…
बैठकीत नक्की काय घडले?
- विकासकामांची आढावा बैठक पालकमंत्री तुलसी सिलावट यांच्या नेतृत्वाखाली झाली होती; पण सर्वांचे लक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांनी वेधले.
- ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर, मंत्री नारायण सिंह कुशवाह, काँग्रेसचे राज्यसभा खासदार अशोक सिंह, महापौर शोभा सिकरवार व काँग्रेस आमदार सुरेश राजे यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या शिंदे यांनीच संपूर्ण बैठकीवर वर्चस्व गाजवले.
- मात्र, ग्वाल्हेरचे भाजपा खासदार भरत सिंह कुशवाह यांच्या रिकाम्या खुर्चीने चर्चांना उधाण आले.

सूत्रांनुसार, मुख्यमंत्री आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांना एकेकाळी आपला अभेद्य गड असलेल्या ग्वाल्हेर-चंबळ पट्ट्यातील गमावलेली जागा परत मिळवण्यास सांगितले आहे. अनेक आठवड्यांपासून ग्वाल्हेरमधील तुटलेले रस्ते आणि तुंबलेल्या गटारांच्या बातम्या चर्चेत आहेत. त्यावर शिंदेंचे निकटवर्तीय असलेल्या ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी बैठकीत “ग्वाल्हेर नरक झाले आहे”, असे स्पष्ट म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी तोमर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. ग्वाल्हेरचे पालकमंत्री तुलसी सिलावट यांनीही त्यांना पाठिंबा दिला. शिंदे काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर यांचा बालेकिल्ला मोरेना येथे एका भव्य सत्कार समारंभासाठी गेले होते. त्यामुळे शिंदे आणि नरेंद्र सिंह तोमर यांच्यातील स्पर्धा आता उघड झाली आहे.
भाजपात दोन गट
सोमवारच्या घटनेतून असे स्पष्ट चिन्ह दिसत आहे की, ग्वाल्हेरमधील भाजपा आता दोन गटांत विभागली आहे. फक्त तीन दिवसांपूर्वी खासदार भरत सिंह कुशवाह यांनी विकास कामांचा आढावा घेतला होता. सोमवारी शिंदे यांनी आपल्या समर्थकांबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि त्याच कामांचा आढावा घेतला. परंतु, हा आढावा खासदारांच्या अनुपस्थितीत घेण्यात आला. त्यामागचा संदेश स्पष्ट होता की, भाजपा खासदार म्हणून शिंदेंनी घेतलेली ही पहिलीच बैठक होती आणि त्यांनी त्यावर स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या समर्थकांमध्ये अशा चर्चाही झाल्या की, काँग्रेसच्या काळात ‘महाराजांचे युग’ पुन्हा येत आहे.
तोमर यांनी सार्वजनिकरीत्या शिंदेंचे गुणगान गायले. मुरार गर्ल्स कॉलेजमध्ये त्यांनी “महाराज, ग्वाल्हेरच्या विकासाचे चाक थांबले आहे. तुम्हीच ते पुढे नेऊ शकता,” असे म्हटले. त्यानंतर लगेचच, शिंदेंचे निष्ठावंत आमदार मोहन सिंह राठोड यांनी सरकारची महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ योजना अपयशी ठरल्याचे सांगितले आणि माझ्या मतदारसंघात एकही प्रकल्प पोहोचलेला नाही, असे म्हटले. त्यानंतर तोमर यांनी ग्वाल्हेरला ‘नरक’ म्हटले. शिंदेंनी चार दिवसांचा दौरा सुरू केला आणि नरेंद्र सिंह तोमर यांच्या बालेकिल्ल्यात मोरेना येथे जाऊन भाजपाला गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त अर्ध्या जागा मिळाल्या, असे म्हटले. त्यांचे लक्ष्य कोण होते, हे सर्वांनाच माहीत होते.
आता ज्योतिरादित्य शिंदेंना केंद्रस्थानी ठेवून झालेली ही बैठक, त्यांना तोमर व सिलावट यांचा मिळालेला पाठिंबा आणि भरत सिंह कुशवाह यांची अनुपस्थिती यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, भाजपाचा गड असलेल्या ग्वाल्हेरमधील परिस्थिती ठीक नाही. काँग्रेसमध्ये असताना मिळालेले अमर्याद वर्चस्व भाजपामध्ये मिळत नसल्याने शिंदे गटाची घुसमट होत आहे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये ही निराशा दिसून येते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
त्यावरून आता सोशल मीडियावरही वाद सुरू आहे. भाजपाचे नेतेच एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. तोमर यांचे निष्ठावंत सोनू मंगल आणि शिंदेसमर्थक दिनेश शर्मा यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे. त्यांच्यातील हा संघर्ष ग्वाल्हेरमधील भाजपामधील फाटाफूट स्पष्टपणे दर्शवतो.