दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीने सर्वच पक्षांना प्रमुख पक्षांना उभारी येईल अशा प्रकारचा निकाल कोल्हापूर जिल्ह्यात दिसून आला. महाविकास आघाडीला सर्वाधिक ठिकाणी झेंडा रोवला असताना भाजपने मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले. बाळासाहेबांची ठाकरे शिवसेनेने पदार्पणातच लक्ष वेधले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणूकीवरही याचे परिणाम दिसून येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या ४२९ ग्रामपंचायत मध्ये मोठ्या चुरशीने निवडणुका पार पडल्या. शहरी भागात मतदानासाठी मतदानातील लक्ष्मीदर्शनाचा विषय विशेष चर्चेत असतो.

तुलनेने ग्रामीण भागात असा प्रकार कमी प्रमाणात घडतो असे आजवर दिसत होते. मात्र हा तर्क या निवडणुकीने मोडून काढला. गावगाड्यातील सत्तेत येण्यासाठी अगदी ऑनलाइन पेमेंटचा प्रकारे वापरात आणला गेला. वित्त आयोगामुळे थेट ग्रामपंचायती मध्ये थेट निधी येत आहे. तो खर्च करताना सरपंचांना महत्त्व असल्याने या पदाची खुर्ची मिळवण्यासाठी काही ग्रामपंचायतीमध्ये निर्णायक मते फिरवण्यासाठी अखेरच्या टप्प्यात पाच आकडी रक्कम वापरण्यात वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. निवडणूक जितकी कमी क्षेत्राची, कमी मताची तितकी पैशाची उधळण अधिक; हे सूत्र अधिक घट्ट होत चालले असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

हेही वाचा: सारथ्य समृद्धीवरचे आणि राजकारणाचे: शिंदेसाठी एक सुसह्य, दुसरे हादरे देणारे

निकालानंतर प्रत्येक पक्षाने, विधानसभा संघनिहाय नेत्यांनी आपल्याच पक्ष, गटाला सर्वाधिक सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला. यामुळे कोणाला किती जागा मिळाल्या याचा गोंधळ सुरूच राहिला आहे. नवनिर्वाचित सरपंच, सदस्य हे मदत केलेल्या नेत्यांची आलटून पालटून भेट घेवू लागल्याने ते नेमक्या कोणत्या गटाचे हा प्रश्न ग्रामस्थांनाही पडला आहे. काही नेत्यांनी आपले संख्याबळ स्पष्ट करण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिरातीचा मार्ग अवलंबला आहे. त्यावरही विरोधी गोटातून आक्षेप घेतला जात आहे. याकरिता प्रत्येक पक्ष, गटाने त्यांच्या सरपंचांना एका मंचावर बोलून शक्तीप्रदर्शन घडवावे अशी मागणी संभ्रमात पडलेल्या ग्रामस्थातून होत आहे. तशी तयारीही काही पक्षांनी सुरू केली असल्याने कोणता सरपंच कोणत्या गटाचा याचा उघड फैसला होणार असल्याने हे चित्र आशादायक ठरत आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्या. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संघटन कौशल्याचे हे यश दिसते. पाठोपाठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांनीही काही तालुक्यांमध्ये काँग्रेसला धवल यश मिळवून दिले. कोल्हापूर दक्षिण मध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती काँग्रेसकडे आल्याने हा आमदार ऋतुराज पाटील यांचा फायदा होणार आहे. महाडिक गटाची पीछेहाट पाहता पुढील वेळेस अमल महाडिक यांना अधिक तयारीने उतरावे लागणार आहे. याच महाडिक गटाला जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिरोली, व्यापारी पेठ असलेल्या गांधीनगर या ग्रामपंचायतीने चांगला हात दिला.

हेही वाचा: जयसिंग गिरासे : समाजभान असलेला कार्यकर्ता

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शिरोली गावातील सत्ता पुन्हा खेचून आणली. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजित घाटगे यांच्या प्रयत्नामुळे भाजपने तिसऱ्या क्रमांकाच्या ग्रामपंचायती मिळवण्यात इतके यश मिळाले. या निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आवाडे – सुरेश हाळवणकर या आजी -माजी आमदारांचे सख्य दिसून आले. कोरोची ही महत्त्वाची ग्रामपंचायतीचा सरपंचपदी या गटाला पराभव स्वीकारावा लागला तरी तारदाळ ,खोतवाडी मधील सत्ता दिलासाजनक ठरली. आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला पन्हाळ्यामध्ये तर माजी आमदार सत्यजित पाटील यांना शाहुवाडी तालुक्यात साथ मिळाल्याने दोघातील विधानसभेचा सामना रंगणार याची झलक दिसून आली. कागल विधानसभा मतदारसंघातील यशावरून दावे – प्रतिदावे सुरूच आहेत. हसन मुश्रीफ यांनी आकडेवारीचा सविस्तर तपशील देत सर्वाधिक ग्रामपंचायती मिळवल्याचे म्हटले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती भाजपकडे आल्या असून हा बदल विधानसभेच्या दृष्टीने सूचक असल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा: नगरमध्ये बाळासाहेब थोरात, रोहित पवार आदी प्रस्थापितांना धक्का

शिवसेनच्या दोन्ही गटात सामना

बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाल्यामुळे त्यांचे अस्तित्व किती याचे उत्तर या अपेक्षित असताना या सामन्यात उद्धव ठाकरे गटाने ५० हून अधिक ग्रामपंचायती मध्ये भगवा फडकावून शिंदे गटावर मात केली. बाळासाहेबांचे ठाकरे शिवसेनेचा प्रभाव दिसून आला तो खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांच्यामुळे. भुदरगड मध्ये माजी आमदार के. पी. पाटील यांनी मोठे यश खेचून आणल्याने ती आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरली. शिरोळ तालुक्यातील आमदार राजेंद्र पाटील आणि त्यांचे स्पर्धक दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांनी संख्याबळाचे दावे करण्यापेक्षा सरपंच सत्काराच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शनाची तयारी चालवली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur district mva achieved most success gram panchayat elections the bjp and balasaheb shivsena achieved good success print politics news tmb 01
First published on: 22-12-2022 at 12:29 IST