कोल्हापूर : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सार्वजनिकरीत्या गळ्यात गळे घालणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांच्यातील सुसंवादाला अवघ्या दोन महिन्याच्या आतच चुड लागली आहे. ऐन दिवाळीत या दोघांतील वादाचे बार उडाले आहेत. कोल्हापूर महापालिकेतील बेबंद कारभार, माजलेला भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांवरील हक्कभंग यावरून दोघात सुरू असलेल्या फुलझड्या महापालिका निवडणूक संपेपर्यंत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

कोल्हापूर शहराच्या राजकारणात सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील सुरुवातीच्या काळातील छुपे मधुर संबंध शहरवासीयांपासून तसे कधीच लपून राहिले नाहीत. मागील विधानसभा निवडणुकी वेळी त्यांच्यातील संघर्ष प्रथमच चव्हाट्यावर आला. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तरवर पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवला. तर कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपचे अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव करीत विजय मिळवला. कोल्हापूरातील दोन्ही जागावरील काँग्रेसचा पराभव जिव्हारी लागलेले सतेज पाटील यांनी महापालिकेतची सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

याच वेळी कोल्हापूर महापालिकेतील निरंकुश कारभार हा राजेश क्षीरसागर – सतेज पाटील यांच्यातील वादाच्या ठिणगीस कारणीभूत बनत चालला आहे. कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेसाठी सतेज पाटील – हसन मुश्रीफ या मंत्र्यांनी प्रयत्न केले. गतवर्षी दिवाळीत नव्या पाण्याने अभ्यंग स्नान करून सतेज पाटील यांनी योजनेचे श्रेय घेतले. त्यामुळे हसन मुश्रीफही दुखावले गेले होते. यंदा दिवाळीतही पुन्हा हेच अभ्यंग स्नान चर्चेत आले आहे.

काळम्मावाडी योजनेचे पाणी शहरात येत असले तरी तिची गळती आणि अपुरी वितरण व्यवस्था यामुळे योजना अपेक्षित फलदायी ठरलेली नाही. या गळक्या योजनेवरून क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका करतानाच दिवाळीत तरी काळम्मावाडी योजनेमुळे व्यवस्थित अभ्यंगस्नान होईल का, याकडे पाटील यांनी लक्ष द्यावे, असा ओरखडा काढला होता.

कोल्हापूर महापालिकेतील रखडलेली विकास कामे, भ्रष्टाचार , निकृष्ट दर्जाची कामे यावरून सतेज पाटील यांनी आमदार क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांनी ‘ दुसरे काहीतरी ‘ काम ऐकले नसेल, म्हणून ते अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याची भाषा करीत असतील. त्यांनी खरेच हक्कभंग आणून त्याचे कारणही जाहीर करावे, असे आव्हान दिले. अग्निशमन विभागाची इमारत दुर्घटना, या कामाची निविदा, प्रशासकांची दुर्घटनेची जबाबदारी आदी मुद्दे उपस्थित करीत सतेज पाटील यांनी ‘ तुम्ही एक रंग दिला तर मी सात रंग देईन, ‘ असे विधान करीत विरोधक जितके प्रकरण तापवतील तितके याचे पदर खोलले जातील असे म्हणत क्षीरसागर यांना सूचक इशारा दिला.

क्षीरसागर यांनी लगोलग सतेज पाटील यांच्या दोषांवर बोट ठेवले. ‘ कोल्हापूर शहर अंतर्गत टोलची पावती फाडणे, कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे राजकारण, सत्तासंघर्षात दक्षिण मतदारसंघाचे केलेले नुकसान, हद्दवाढीबाबत अबोला, शक्तीपीठ महामार्गाला विरोध या पद्धतीने विकासकामांना बगल देवून शहराचे नुकसान करण्याचे काम महापालिकेत सत्ता भोगणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी वर्षोनुवर्षे केले आहे. त्यांनी शहरवासीयांच्या माथी मारलेल्या गळक्या काळम्मावाडी योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी विधीमंडळात करावी ,’ असे आव्हान देतानाच ‘ महापालिका निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी सात नाही आठ रंग द्यावेत, ‘ असा प्रतिटोला क्षीरसागर यांनी लगावला आहे. गणपतीत आकाराला येऊ लागलेले राजकीय मैत्र दिवाळीत आपटबारावर असे येऊन ठेपले आहे.