कोल्हापूर : मनसे स्थापन झाल्यापासून ती कोल्हापुरात शिवसेनेशी फटकून राहिली आहे. शिवसेनेच्या संघटन ताकतीच्या तुलनेत मनसे अगदीच यथातथा राहिली आहे. यामुळे मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे सेना आणि मनसे यांच्यात कितपत मनोमिलन घडणार, दोन्ही ठाकरेंचे हे पक्ष राजकीयदृष्ट्या एकत्रित कसे नांदणार याचे कुतूहल निर्माण झाले आहे.
मुंबई मध्ये मराठीच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे हे एकत्र आले. मीरा भाईंदर येथेही दोन दिवसापूर्वी याच मुद्द्यावर या दोन्ही पक्षांनी एकत्रित संघर्ष केला. यानंतर आता या दोन्ही पक्षांची राजकीय वाटचाल एकत्रित होण्याचे संकेत दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात गेली २० वर्षे विरुद्ध मार्गानी जाणाऱ्या या दोन पक्ष एकत्रित कशी वाटचाल करणार याची चर्चा होत आहे.
सेनेत अंतर्गत मतभेद
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा लक्ष घातल्यामुळे शिवसेनेला बाळसे आले. शहरात अनेकदा शिवसेनेचे आमदार निवडून आले. ११ वर्षांपूर्वी तर सहा आमदार आणि दोन खासदार इतकी सेनेची ताकद वाढली होती. आता या पक्षाचा एकही आमदार नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे सेना तशी कमजोर झाली आहे, शिवाय, अंतर्गत मतभेदामुळे पक्षाचे वाढ कितपत होणार हाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मनसे नेतृत्वामुळे डागाळली
दोन दशकापूर्वी मनसे स्थापन झाल्यावर कोल्हापुरात शिवसेनेतील माजी आमदार सुरेश साळोखे , पुंडलिक जाधव, सुजित चव्हाण, गजानन जाधव आदींनी रेल्वे इंजिनात बसने पसंत केले. यातील बहुतेकांनी हा मार्ग लगेचच सोडला. कोल्हापूर महापालिकेत राजू दिंडोर्ले हे एकमेव नगरसेवक निवडून गेले होते. सध्या जिल्हाध्यक्षपदी असलेले दिंडोर्ले व शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांची प्रतिमा डागाळलेली आहे. २०१६ मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकास मारहाण केल्यानंतर दिंडोर्ले, त्याचे भाऊ व चालक यांच्या विरोधात महापालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन ठेवले होते. त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. अलीकडेच कोल्हापुरातील एका पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकास बेदम मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, खंडणी या प्रकरणीया जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. एकूणच कोल्हापुरातील मनसे पक्ष वाढवण्यात नेतृत्व अपयश ठरल्याचे एकंदरीत संघटन बांधणीवरून दिसत आहे.
मराठी तारणार ?
कमकुवत झालेली ठाकरे शिवसेना आणि प्रतिमा डागाळलेले मनसेचे नेतृत्व यांची राजकीय वाटचाल कितपत दमदार होणार हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तथापि मराठीच्या हुकमी मुद्द्यावर जिल्ह्यात उभारी घेऊ असा विश्वास दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाकडून व्यक्त केला जात आहे.
कोल्हापुरात शिवसेनेने आपली ताकद वेळोवेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दाखवून दिली आहे. आता उद्धव – राज हे बंधू एकत्रित आल्याने जिल्ह्यात दोन्ही पक्ष ताकतीने काम करतील. आगामी निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्येय निश्चितपणे येईल, असा विश्वास ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार यांनी व्यक्त केला.
मनसेने नेहमी रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न हाताळलेले आहेत. मराठी भाषकांच्या प्रश्नाला कोल्हापुरातली चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेना – मनसे यांनी एकत्रित काम केल्यास दोन्ही पक्षांनाही त्याचा फायदा होईल, असे मनसेचे परिवहन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी सांगितले.