लेह ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल (LAHDC) च्या तिमिसगाम जागेसाठी १३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला धक्का दिला असून येथील जागा राखण्यास काँग्रेसला यश आलं आहे. LAHDC मध्ये भाजपा विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. यासाठी लडाखचे भाजपा खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांच्यासह विविध प्रमुख नेत्यांनी भाजपाचा प्रचार केला होता.

जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचं मानलं जात होतं. असं असतानाही काँग्रेसने लडाखमधील पोटनिवडणूक जिंकल्याने सर्वांना धक्का बसला आहे. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर लडाखमध्ये काँग्रेसची ही पहिलीच परीक्षा होती. यामध्ये काँग्रेसनं यश संपादन केलं असून हा विजय काँग्रेससाठी आशेचा किरण ठरत आहे.

शनिवारी लडाखमधील तिमिसगाम पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसचे ताशी टुंडुप यांना ८६१ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या दोरजे नामग्याल यांना ५८८ मते मिळाली. या निवडणुकीत ताशी टुंडुप यांचा विजय झाला आहे. २०२० साली झालेल्या हिल काउन्सिलच्या निवडणुकीत भाजपाने २६ पैकी १५ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला नऊ जागांवर विजय मिळवता आला. उर्वरित दोन जागा अपक्षांनी जिकल्या होत्या. काँग्रेसचे नगरसेवक सोनम दोरजे यांच्या निधनामुळे तिमिसगामची जागा रिक्त झाली होती.

या निकालानंतर काँग्रेस नेते आणि एलएएचडीसीमधील विरोधी पक्षनेते टी नामग्याल यांनी सांगितलं की, लेहमधील लोकं भाजपाला धास्तावलेले आहेत, हे या विजयातून दिसतंय. लडाखच्या लोकांना आपल्या नोकऱ्या, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी या प्रदेशात संविधानाची सहावी अनुसूची लागू करण्याची इच्छा आहे. यासाठी वारंवार मागण्या आणि आंदोलने करूनही भाजपाने संविधानाची सहावी अनुसूची लागू केली नाही,” असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी संबंधित निकालानंतर ट्वीट करत म्हटलं की, मोदी, शाह आणि आझाद यांच्यासाठी ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. लडाख हिल काउन्सिलमधील तिमिसगाम पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपाचा मोठ्या फरकाने पराभव केला. या यशासाठी लडाख जिल्हा काँग्रेस कमिटीचे हार्दिक अभिनंदन.