Lalu Prasad Yadav on Emergency: देशाच्या इतिहासात पहिली आणि एकमेव आणीबाणी लागू करण्याला नुकतीच ५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधाऱ्यांकडून २५ जून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची आजची धोरणं आणीबाणीपेक्षा कमी नसल्याचा आरोप केला. या सर्व पार्श्वभूमीवर ५० वर्षांपूर्वीची परिस्थिती प्रत्यक्ष जगलेले, अनुभवलेले आणि इंदिरा गांधींच्या विरोधातील आंदोलनात जयप्रकाश नारायण अर्थात जे. पी. नारायण यांच्यासोबत आंदोलनात अग्रभागी असणारे लालू प्रसाद यादव यांनी इंदिरा गांधींच्या लोकशाहीबाबतच्या आदराचं कौतुक केलं आहे!
इंडियन एक्स्प्रेसनं राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या सविस्तर मुलाखतीमधील काही भाग आणीबाणीच्या निमित्ताने प्रकाशित केला आहे. यामध्ये लालू प्रसाद यादव यांनी इंदिरा गांधींबाबत आपलं मत व्यक्त करतानाच आणीबाणीच्या काळातील काही आठवणीही ताज्या केल्या आहेत. विशेषत: जयप्रकाश नारायण यांच्यासोबत कशा प्रकारे सरकारविरोधी आंदोलनाने आकार घेतला, यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
आणीबाणीबाबत तुमची पहिली आठवण काय आहे?
एक विद्यार्थी नेता म्हणून मी ‘जेपी मूव्हमेंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात झोकून देऊन काम करत होतो. आणीबाणी लागू करण्याच्याही खूप दिवस आधी मला अटक करण्यात आली होती. पण तरी आंदोलन चालूच होतं. अनेक विद्यार्थी नेत्यांना अटक करण्यात आली. आम्ही तुरुंगातही चांगलं अन्न मिळावं यासाठी आंदोलन करत होतो.
विकासाच्या नावाखाली झालेल्या अत्याचारांना इतिहास साक्ष आहे. आज आपण जे अधिकार उपभोगत आहोत, ते मोठ्या कष्टानं आपल्याला मिळालेले आहेत. आता त्यांचं संरक्षण करणं हे आपल्या हातात आहे. ज्यांनी आणीबाणीचा काळ सहन केला आहे, त्यांच्या व्यथा कधीही विसरता येण्यासारख्या नाहीत. सक्तीच्या नसबंदीच्या मोहिमेनं अशा जखमा दिल्या आहेत, ज्या भरून येण्यासाठी अनेक वर्षं लागतील. सत्तेच्या क्रूरपणे केलेल्या वापरामुळे निरपराध लोकांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं.
एक साधी विद्यार्थी चळवळ आणीबाणी घोषित करण्यापर्यंत पोहोचू शकेल असं तुम्हाला वाटलं होतं का?
८ जून १९७४ रोजी आम्ही काही विद्यार्थ्यांना घेऊन एक मोर्चा काढला होता. हॉस्टेल आणि खानावळीतील परिस्थिती सुधारावी, दर्जा सुधारावा, महाविद्यालयाची फी, बसभाडं कमी करावं अशी मागणी आम्ही करत होतो. सुरुवातीला त्यात कोणताही राजकीय सहभाग नव्हता. जेव्हा हा मोर्चा हिंसक झाला आणि त्याची व्याप्ती वाढत गेली, तेव्हा आम्ही जेपींकडे गेलो आणि त्यांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं, अशी विनंती केली. त्यांची इच्छा नव्हती, पण नंतर ते एका अटीवर तयार झाले. आंदोलक कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाहीत, असं ते म्हणाले.
आम्हाला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की ते आंदोलन पुढे जाऊन इंदिरा गांधींच्या सत्तेला धक्के देईल. १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील विजयानंतर इंदिरा गांधी एक सामर्थ्यशाली आणि अधिकारशाही नेत्या म्हणून प्रस्थापित झाल्या होत्या. पण जयप्रकाश नारायण यांनी पाटण्यातील गांधी मैदानापासून सुरु झालेलं आंदोलन दिल्लीच्या रामलीला मैदानापर्यंत पोहोचवून सगळं चित्रच बदलून टाकलं. त्या वेळचे सर्व विरोधी नेते त्या आंदोलनात सहभागी झाले. इंदिरा गांधींना या बदलत्या परिस्थितीचा अंदाजच आला नाही!
आता ५० वर्षांनंतर तुम्ही आणीबाणीकडे कसं पाहता?
आता इतक्या वर्षांनंतर मला वाटतंय की इंदिरा गांधी यांना लोकशाहीबाबत आदर होता. आणीबाणीनंतरही त्यांनी नव्याने निवडणुकांची घोषणा केली, १९७७ साली या निवडणुका पार पडल्या आणि त्यांनी मोठ्या मनाने त्यांचा पराभव मान्य केला. यानंतर त्यांनी मेहनत केली, काम केलं आणि १९८० साली त्या पुन्हा सत्तेत आल्या.
सध्याच्या एनडीए सरकारकडे पाहिलं तर असं वाटतं आत्ता अघोषित आणीबाणी चालू आहे. सरकारी संस्थांबद्दल अजिबात तारतम्य राहिलेलं नाही. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय सूडासाठी सरकारच्या हातातलं बाहुलं बनल्या आहेत. मला कित्येक वर्षांपासून अशाच पद्धतीने लक्ष्य केलं जात आहे. पण मी त्यांच्यासमोर झुकलेलो नाही.
सत्ताधारी म्हणतात की विरोधक आम्हाला हरवू शकत नाहीत म्हणून ते असं बोलत राहतात, त्यावर तुमचं काय मत आहे?
तुम्ही कोणत्याही शिक्षण संस्थेत जा. तुम्हाला तिथे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत आणि नियुक्त्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचा शिक्का दिसेल. त्यांच्या राजकीय विरोधकांशी बोला, ते तुम्हाला राजकीय सूडाबद्दल सांगतील. एनडीएनं आमच्याविरोधात इतकं मोठं यश मिळवल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी मला लक्ष्य करत असतात.
येत्या बिहार विधानसभा निवडणुकांकडे तुम्ही कसं पाहता?
तेजस्वी यादवनं जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आहे. त्यानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सरकारी नियक्त्या स्थगित करणं भाग पाडलं. याशिवाय, नितीश कुमार यांना पेन्शन ४०० रुपयांवरून ११०० रुपयांपर्यंत वाढवणंही भाग पडलं आहे. निवडणुकीच्या वर्षांत सत्ताधाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांना बळी न पडण्याचं आवाहन मी सातत्याने जनतेला करत आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बिहार दौऱ्यांमध्ये जुमल्यांचा पाऊस पाडत आहेत. याबाबत लोकांनी सतर्क राहायला हवं.