मुंबई : भाजपने माजी खासदार पूनम महाजन यांना पुन्हा डावलले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक संचालन समितीमध्ये आणि प्रत्येक लोकसभा निहाय समितीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यापासून नाराज असलेल्या महाजन यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून विविध मुद्द्यांवर व पर्यायांवर चर्चा केली.
फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यामुळे महाजन यांना दोन वेळा निवडून येवूनही भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली, असा त्यांचा समज आहे. ऐनवेळी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उमेदवारी नाकारल्याचे स्थानिक नेतृत्वाने त्यांना सांगितले. मतदारसंघात कमी जनसंपर्क, पदाधिकाऱ्यांशी फटकून वागणे, यासह त्यांच्या खासगी सचिव व कर्मचाऱ्यांबाबतही वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. उमेदवारी नाकारल्यापासून महाजन या पक्षातील नेत्यांवर नाराज होत्या. त्या निकम यांच्या प्रचाराला फिरकल्याही नाहीत व त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही त्या प्रचारापासून अलिप्त राहिल्या आणि पक्षाच्या बैठकींनाही हजर राहिल्या नाहीत.
त्यामुळे पक्षाने त्यांच्या नाराजीची गंभीर दखल घेवून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारापासून दूरच ठेवले आहे. शेलार यांनी २७ सदस्यांची निवडणूक संचालन समिती महिनाभरापूर्वी नियुक्त केली आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघ निहाय प्रभारींचीही नियुक्ती केली. त्यात मुंबईतील आजी-माजी आमदार-खासदार आहेत. पण त्यात महाजन यांचा समावेश करण्यात आला नाही. पक्षाने माजी खासदार गोपाळ शेट्टी व मनोज कोटक यांना उमेदवारी नाकारली होती. पण त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या संचालन समितीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले आहे. महाजन यांचे शेलार व अन्य स्थानिक नेत्यांशी फारसे सख्य नसल्याने त्यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय पातळीवर राजकारण करण्याची इच्छा असलेल्या महाजन यांना सध्या तेथे कोणतीही संधी मिळालेली नाही. निकम यांना राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून पाठविण्यात आल्याने महाजन यांना २०२९ मध्ये पुन्हा उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. महिला आरक्षण लागू झाल्यास त्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असतील.
त्यामुळे महाजन यांनी मतदारसंघात भेटीगाठी व जनसंपर्क वाढविण्यावर सध्या भर दिला आहे. फडणवीस यांच्यावर नाराजी असली, तरी जुळवून घेतल्याखेरीज महाजन यांना राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर संधी मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी नुकतीच फडणवीस यांची ‘ वर्षा ‘ निवासस्थानी भेट घेवून मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा केली. फडणवीस यांच्या २०१४-१९ या कार्यकाळात मुख्य मंत्री वॉर रुममध्ये समावेश असलेल्या त्या एकमेव खासदार होत्या. मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारणीसाठी तत्कालीन अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या कृतीगटात त्या उपाध्यक्षही होत्या. मात्र पुढे फडणवीस यांच्याशी बिनसल्याने महाजन यांना लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा मतदारसंघात सक्रिय होण्यास सुरूवात केली आहे.